देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा फोन; करेक्ट कार्यक्रमामुळे अभिनंदनाचा वर्षाव!
देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोन केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन देगलूरच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
नांदेड : देगलूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. अंतापूरकरांनी भाजपच्या सुभाष साबणे यांना आस्मान दाखवलं. पण हा विजय शक्य झाला काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या परिश्रमाने…! कालच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांनी फोन केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनी पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन देगलूरच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी तब्बल महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत विधानसभेत धमाकेदार एन्ट्री केली.
सोनिया गांधी, पवार ठाकरेंचा अशोक चव्हाण यांना फोन!
देगलूरचा निकाल दुपारी 3.30 च्या आसपास स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाचं चीज झाल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. सोनिया गांधी यांनी जितेश अंतापूरकर यांच्या राजकीय आयुष्याला शुभेच्छा देताना चांगलं काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देगलूरच्या विजयानंतर दूरध्वनी करून विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दुपारीच शुभेच्छा दिल्या होत्या. तीनही नेत्यांचा मी आभारी आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 2, 2021
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त बारामतीत एकाच मंचावर होते. कालचा कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, त्यावेळी अंतापूरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं होतं. निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. शरद पवार यांनीही अशोक चव्हाण यांना फोन करुन देगलूरच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात राजकीय चर्चाही झाली.
निकालानंतर अशोक चव्हाण यांचं ‘विजयी’ ट्विट!
देगलूरच्या विजयाने अशोक चव्हाण यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पुन्हा झलक पाहायला मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच देगलूर जिंकल्याने अशोक चव्हाण यांचं राजकीय वजनही चांगलं वाढलं आहे. तसंच अशोक चव्हाण यांचा आत्मविश्वासही चांगलाच दुणावला आहे. देगलूर हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे, अशा शब्दात देगलूरच्या विजयाचं महत्त्व अशोक चव्हाण यांनी अधोरेकित केलं.
देगलूर पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय ही स्व.आ. रावसाहेब अंतापूरकर यांना खरी श्रद्धांजली आहे. ४१ हजारांहून अधिक मताधिक्याचा हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे. pic.twitter.com/JYRY48ezfE
— Ashok Chavan (@AshokChavanINC) November 2, 2021
(Soniya Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray Phone call To Ashok Chavan After nanded Deglur bypoll result)