ST Andolan Mumbai : ज्या भगिनी विधवा झाल्या…, पवारांच्या घरी काढलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया
हे आंदोलन अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. राष्ट्रवादीच्या आरोपानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
मुंबई : आपल्या मागण्यांसाठी मागील तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून आझाद मैदानावर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी (ST Workers) आज थेट पवारांच्या निवासस्थानी धडकले. शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि बाटल्याही फेकण्यात आल्या. अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलीसही काही काळ चक्रावले. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, हे आंदोलन अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि भाजपच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. राष्ट्रवादीच्या आरोपानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सदावर्तेंची प्रतिक्रिया
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. परंतु तुम्हाला सांगतो की केसचा निकाल लागल्यानंतर विपश्यना करा, शांतता राखा, मनस्थिती शांत ठेवा, असं मी आणि न्यायमूर्तींनीही सांगितलं. व्यथित झालेल्या महिलांचा तुम्ही हल्ला हल्ला म्हणून बोलू नका. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे तर गुलामगिरीतून बाहेर येण्याचं लक्षण आहे. कोविड काळात वीर मरण पत्करलेल्या विधवा झालेल्या महिलांसाठी कोर्टात उभं करणं मी हल्ला करण्यासाठी उभा राहीन का? असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय.
‘त्यांना सीमापारच्या नागरिकांसारखं वागवू नका’
तसंच माझ्यावर एकही व्हायलन्स नाहीये. लक्षात ठेवा डॉ. सदावर्ते कधी खोटं बोलत नाही, वागत नाही. तुमचे प्रतिनिधी सकाळपासून माझ्या संपर्कात होते. 118 अधिकाऱ्यांची केस चालवत असताना प्रतिनिधींनी मला ही बाब सांगितली. मला याची काहीही कल्पना नव्हती. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करु नका. राजकारण चुलीत घातलं पाहिजे. विधवा भगिनींवर राजकारण करायचं असतं का? कोणत्याच अहिंसेचं समर्थन करता येणार नाही. ज्या भगिनी विधवा झाल्या, त्यांच्या भावनांना कुणी तुडवलं तर ? हे हिंदुस्थानी नागरिक आहेत, त्यांना सीमापारच्या नागरिकांसारखं वागवू नये, असं आवाहन सदावर्ते यांनी केलंय.
‘हे राष्ट्रवादीकडूनही केलं गेलं असेल’
संवंधिनिक मर्यादा आम्ही ओलांडलेली नाही. संविधानाच्या बाहेर आम्ही एकही शब्द बोललेलो नाही. एक शब्द तुम्ही वापरला की ड्रामा.. ड्राम्याला हल्ल्याचं स्वरुप देऊ नये. 124 विधवा झालेल्या भगिनी, लोकांच्या प्रती त्यांना तुम्ही हल्लेखोर ठरवू नका. चौकशी आधी फाशीची प्रथा कुठेच नाही. सुप्रिया सुळेच म्हणतात की मी चर्चा करायला तयार आहे, तर मग संवादातून आक्रमकता झाली असेल त्याला तुम्ही हल्ला कसं म्हणता? असंही सदावर्तेंनी विचारलंय. हा हल्ला नाही, याला हल्ल्याचं रुप दिलं जातंय. हायवोल्टेज ड्रामा तयार करुन राष्ट्रवादीकडूनही केलं जाण्याचा प्रकार असू शकतो, अशी शंकाही सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.
काल जल्लोष आणि आज आक्रोश, असं का?
मला आजच्या आक्रोशाचं काहीही माहिती नाही. अशोक चव्हाण हे नांदेडचे आहेत. नांदेडच्या एका कष्टकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना 50 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देईन आणि कुटुंबातील एकाला नोकरी देईल, असं म्हटलं होतं. विधवा भगिनींचा विषय न्यायालयात नव्हता, या भगिनींना तुम्ही हल्लेखोर म्हणू नका, या भगिनींच्या सौभाग्याच्या मृत्यूच्या टाळूवरचं राजकारण कुणीही करु नका, असं आवाहनही सदावर्ते यांनी केलंय.
इतर बातम्या :