ST Andolan Mumbai : ‘महाराष्ट्राचं राजकारण इतकं घाणेरडं कधीही नव्हतं, चौकशी करुन कठोर कारवाई होणार’, आदित्य ठाकरेंचा इशारा
युवासेना प्रमुख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंही दाखल झाले. या प्रकाराची चौकशी होईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिलाय.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्याच्या (ST Workers) सुरु असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आज वेगळं वळण मिळालं. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धडक दिली. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पवारांच्या निवासस्थानी चपला आणि बाटल्या फेकण्यात आल्या. या प्रकारामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्री सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यात युवासेना प्रमुख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंही (Aditya Thackeray) दाखल झाले. या प्रकाराची चौकशी होईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिलाय.
शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. काही वेळ पवारांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधकांना इशारा दिलाय. ‘महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांवर कारवाई होणार हे स्पष्ट केलंय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सदावर्तेंची प्रतिक्रिया
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. परंतु तुम्हाला सांगतो की केसचा निकाल लागल्यानंतर विपश्यना करा, शांतता राखा, मनस्थिती शांत ठेवा, असं मी आणि न्यायमूर्तींनीही सांगितलं. व्यथित झालेल्या महिलांचा तुम्ही हल्ला हल्ला म्हणून बोलू नका. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे तर गुलामगिरीतून बाहेर येण्याचं लक्षण आहे. कोविड काळात वीर मरण पत्करलेल्या विधवा झालेल्या महिलांसाठी कोर्टात उभं करणं मी हल्ला करण्यासाठी उभा राहीन का? असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय.
सुप्रिया सुळेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच घडतंय. माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे. चर्चेला बसायची माझी तयारी आहे. आपण चर्चेला बसू शकतो. आपण याआधीही बसलेलो आहोत. जे काही करायचं, ते शांततेनं करुयात. काल जे जल्लोष करत होते, ते आज अचानक आंदोलनावर का उतरले? माझ्या घरावर आज मोठा हल्ला झाला आहे. हा दुर्दैवी आहे. आम्हाला या सगळ्यातून सुरक्षित ठेवल्यावरुन मी एवढंच बोलू शकते, ही मुंबई पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
इतर बातम्या :