मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब, सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे ही राज्यकर्त्यांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. राज्य सरकारचे एकूण धोरण पाहता आघाडी सरकारला महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनविण्याची घाई झालेली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केली.
मुंबई : ज्या मंत्रालयातून राज्य कारभार चालविण्याची शपथ घेतली जाते, त्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे ही राज्यकर्त्यांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. राज्य सरकारचे एकूण धोरण पाहता आघाडी सरकारला महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनविण्याची घाई झालेली आहे, अशी घणाघाती टीका भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार महेश बालदी आणि गणेश हाके यावेळी उपस्थित होते. (Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government)
मुनगंटीवार म्हणाले की, आघाडी सरकारने मागील आर्थिक वर्षांत मद्य विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. आता किराणा दुकानात बिअर आणि वाईन विक्रीला परवानगी देण्याचा विचार आघाडी सरकार करत आहे. मद्य घेणारे आणि मद्य विक्रेते यांच्या आधारावरच राज्याची अर्थव्यवस्था टिकून आहे असा समज आघाडी सरकारने करून घेतल्याचे दिसत आहे. राज्य सरकारचे धोरण पाहून मद्य विक्रेत्यांकडून मिळकत कर माफ करण्याची मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याच्या दिशेने आघाडी सरकारची वाटचाल सुरु आहे असे दिसते आहे. मंत्रालयात मद्याच्या बाटल्या सापडल्याने आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. ज्या मंत्रालयातून राज्यकारभार चालविण्याची शपथ घेतली जाते त्याच मंत्रालयात असा बेधुंद कारभार सुरु असणे ही आघाडी सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
मंदिरं बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच – सदाभाऊ खोत
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरणच आहे. त्यामुळे त्यात काहीच नवीन नाीही, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 15 वर्ष सत्ता असताना ज्यांनी धनगर आरक्षण दिलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर उगाच टीका करू नये. फडणवीसांनी जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती धनगरांना लागू केल्या होत्या. त्यामुळे आता या सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, असं आवाहन खोत यांनी केलं.
दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व शरम आणणारी अशी घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.
संबंधित बातम्या :
दारूच्या बाटल्यांच्या प्रकरणाची 15 दिवसात उच्चस्तरीय चौकशी करा, दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कडोकोट सुरक्षा तरीही मंत्रालयात दारुच्या बाटल्या कशा? प्रविण दरेकर म्हणतात….
Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government