‘ऐकलं नाहीत तर याद राखा, विधानसभेत हक्कभंग आणणार’, मुनगंटीवारांचा निर्वाणीचा इशारा
सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी 30 एप्रिल 2020 ला संपला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचं आहे. त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराच मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.(Sudhir Mungantiwar’s warning to the state government on the issue of Marathwada and Vidarbha)
विधानसभेत हक्कभंग मांडणार
राज्य सरकार 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा, सरकारमध्ये सध्या हेच सुरु असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकच नाही तर विधानसभेत याबाबत हक्कभंग आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केलीय.
विधानसभा अध्यक्ष निवड
विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही हे आमचे नेते ठरवतील. विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचे संकेत आहेत. ते पाळण्याविषयी सरकार काहीच बोलत नाही. एक पाऊल त्यांनी चालावं एक पाऊल विरोधी पक्षाने पुढे यावं. तुम्ही उमेदवार उभा करु नका आणि आमची हेकड भूमिका, असं चालणार नसल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरुनही सरकारवर निशाणा
हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय, अशी मिश्किल टिप्पणी मुनगंटीवारांनी केलीय. प्रदेशाध्यक्षांनी मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात, असा जोरदार टोलाही मुनगंटीवार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि मंत्र्यांना लगावला आहे.
संबंधित बातम्या :
24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी भाजपचं जेलभरो आंदोलन, बावनकुळेंची घोषणा
मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक केव्हाही, बी अॅलर्ट, कामाला लागा; विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Sudhir Mungantiwar’s warning to the state government on the issue of Marathwada and Vidarbha