Sandipan Bhumre : कारखान्यातील स्लिप बॉय ते शिंदे सरकारमध्ये मंत्री; वाचा, संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास!
Sandipan Bhumre : भुमरे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ते यश आल्यानंतर हुरळून जात नाहीत. यश मिळाल्यावर डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही आणि पराभवाने खचून जायचे नाही, असं साध सोपं त्यांचं गणित आहे. त्यामुळेच ते सातत्याने निवडून येत असतात.
मुंबई: शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. भुमरे यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (maharashtra government) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांना खातं दिलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना नेमकं कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाचवेळा विधानसभेवर (vidhansabha) निवडून आलेले संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री होते. त्यामुळे त्यांना आता परत तेच खातं दिलं जाणार की दुसरं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अत्यंत संघर्ष करत त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. भुमरे यांच्या या राजकीय प्रवासावर टाकलेला हा प्रकाश…
कोण आहेत संदिपान भुमरे?
संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. भुमरे यांचा जन्म 13 जुलै 1963 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं आहे. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.
ज्या कारखान्यात स्लिप बॉय, त्याच कारखान्याचे चेअरमन
संदीपान भुमरे यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष कारवा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांनी पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम केलं. विशेष म्हणजे ज्या कारखान्यात त्यांनी स्लिप बॉय म्हणून काम केलं, पुढे त्याच कारखान्याचे चेअरमन झाले.
शिवसेनेची शाखा स्थापन, नवी इनिंग सुरू
कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी 1988मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय इनिंगला सुरुवात केली. 1989मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभातीपद मिळवले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1993मध्ये ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले.
अशी मिळाली उमेदवारी
छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे यांनीही बंडखोरी केली होती, त्यामुळे 1995च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची हे शिवसेनेत ठरत नव्हते. शिवसेनेचे नेते, दिवंगत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1999 आणि 2004 निवडणूकही जिंकली. संपूर्ण पैठण तालुका त्यांनी शिवसेनामय केला.
एक पराभव, दोन विजय
सलग तीनवेळा निवडून आल्यानंतर भुमरे यांचा विजयी रथ राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी रोखला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे यांना पाच वर्षे घरी बसावं लागलं. मात्र, याकाळात भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे 2014 आणि 2019ची निवडणूक सहजपणे जिंकली.
पाचव्यांदा आमदार
भुमरे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा 14 हजार 139 मतांनी पराभव केला होता.
डोक्यात हवा नाही, पराभवाने खचत नाही
भुमरे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ते यश आल्यानंतर हुरळून जात नाहीत. यश मिळाल्यावर डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही आणि पराभवाने खचून जायचे नाही, असं साध सोपं त्यांचं गणित आहे. त्यामुळेच ते सातत्याने निवडून येत असतात. शिवाय त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. रात्रीअपरात्री लोकांच्या कामाला धावून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, त्याचाही त्यांना निवडणुकीत फायदा होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कारखान्यावर टाच, साखर आयुक्तांकडून जप्तीचे आदेश
मार्च 2021मध्ये भुमरे यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखान्यावर टाच आली होती. साखर आयुक्तांनी भुमरे यांचा कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचं साखर आयुक्तांनी म्हटलं होतं. तर, थकित रक्कम भरल्याचा दावा मंत्री संदिपान भुमरे यांनी केला होता. या प्रकरणामुळे भुमरे चांगलेच अडचणीत आले होते.