नगरमधून सुजय विखेच, राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास निश्चित : सूत्र
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुजय विखे पाटील निवडणूक लढतील, अशीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात सुजय विखेंच्या राष्ट्रवादी […]
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुजय विखे पाटील निवडणूक लढतील, अशीही शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात सुजय विखेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच सुजय विखे पाटील हे मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. मात्र, परंपरेने राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरुन राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला येत असल्याने, सुजय विखेंची मोठी गोची झाली आहे. किंबहुना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही पक्षात ज्या जागांवरुन तिढा होता, त्यात नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता. मात्र, आता सुजय विखे संपूर्ण डावच उलटवत राष्ट्रवादीत प्रवेश करुन, इथून लोकसभा लढणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?
विखे-पवार वाद
पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी कधीच सोडली नव्हती. पुढे अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीच्या नेत्यांमध्येही कधी सूर जुळला नाही. या दोन्ही नेत्यांमध्येही कायम धुसफूस सुरुच असते. मात्र, आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेशाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विखे कुटुंबातील तिसरी पिढी पवार कुटुंबाशी जुळवून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण नगरमधील राजकारणालाही आगामी काळात वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.