अहमदनगर : लोकसभा-विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी तिकिटासाठी दबावतंत्र वापरले जात आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही अशीच काहीसी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच घरात फूट पडण्याची शक्यता इथे निर्माण झाली आहे. विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे लोकसभा लढण्याच्या तयारीत असून, मात्र सुजय विखे कुठल्या पक्षाकडून लढणार याबाबत अहमदनगरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवासांपासून दक्षिण अहमदनगरमध्ये लोकसभेच्या या जागेबाबत चर्चा सुरु आहेत. सुजय विखे इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, दक्षिण अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास, या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल, हे ओघाने आलेच. मात्र, सुजय विखेंना लढायचं असल्यास, ही जागा काँग्रेसच्या खात्यात असणे आवश्यक असेल. मात्र, सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी ही जागा सोडेल का, हा प्रश्नच आहे.
गेल्यावेळी म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून राजीव राजळे लढले होते. राजीव राजळे यांचे गेल्या वर्षी निधन झाले. सध्या भाजपचे दिलीप गांधी हे या जागेवरुन विद्यमान खासदार आहेत.
सुजय विखे पाटील यांनी राजकीय प्रवेशाची जोरदार तयारी केलीय. मात्र, सुरुवात काँग्रेसमधून करणार की, भाजपची वाट धरणार, की आणखी कोणत्या पक्षाची निवड करतात, याबाबत संदिग्धतात कायम आहे. कारण काल माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रसंगी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याबाबतही संकेत दिलेत.
सुजय विखे पाटील काल नेमके काय म्हणाले?
“माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत, माझ्या मातोश्री या काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत, पण तो माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे. कोणता पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे. वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की, वडील ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात मुलाने राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे, मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल, तर मला मान्य असलेल्या नेतृत्त्वाकडे मी जाईन. भले माझ्या कुटुंबाचा विरोध असला, तरी मी थांबणार नाही. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकजणाला आपला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या आई-वडिलांना जसा निर्णय घेतला, तसा मीही घेईन.” – सुजय विखे पाटील
दरम्यान, आता काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपास सुरुवात होईल. त्यावेळी दक्षिण अहमदनगर लोकसभेची जागा, जी आता राष्ट्रवादीकडे आहे, ती सुजय विखे पाटलांसाठी काँग्रेसला दिली जाते की, राष्ट्रवादी सोडण्यास नकार देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीने जागा सोडली नाही, तर सुजय विखे भाजपची वाट धरण्याची दाट शक्यता अहमदनगरमधील राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते आहे.
बातमीचा व्हिडीओ :