लोकसभा निवडणूक लढणार नाही, सुमित्रा महाजन यांचं पक्षाला पत्र
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच त्यांनी याबाबतच पत्र पक्षाला लिहलं आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही भाजपकडून इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी पत्र लिहिलं. सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघामधून त्या निवडून आल्या आहेत. या […]
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच त्यांनी याबाबतच पत्र पक्षाला लिहलं आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही भाजपकडून इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. त्यामुळे सुमित्रा महाजन यांनी पत्र लिहिलं. सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघामधून त्या निवडून आल्या आहेत.
या पत्रात सुमित्रा महाजन यांनी भारतीय जनता पक्षाकडून आतापर्यंत इंदूर लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. हा निर्णय अद्याप का घेतला जात नाही याबाबत मला कल्पना नाही. पण हा निर्णय घेताना पक्षाला संकोच वाटत असावा, असे म्हटले आहे. तसंच मला यंदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे मी पक्षाला आधीच सांगितले होते आणि याबाबतचा संपूर्ण निर्णय त्यांच्यावर सोडला होता. पण पक्षाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने मी लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा करत आहे. माझ्या या निर्णयामुळे पक्षाने उमेदवाराचा निर्णय नि:संकोच होऊन करावा, असे सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.
इंदूरच्या जनतेने मला आजपर्यंत दिलेल्या प्रेमाची मी आभारी आहे. त्याशिवाय पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच इतरांनी मला जी मदत केली त्यांचेही मी आभार व्यक्त करते. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा. यामुळे पक्षाला इंदूरमध्ये प्रचार करणे सोपे जाईल, असेही सुमित्रा महाजन यांनी पत्रात नमूद केलं आहे
भाजपचे मध्य प्रदेशातील बहुतांश उमेदवार जाहीर झाल्यानंतरही इंदूरचा उमेदवार जाहीर झालेला नाही. यावरुन सुमित्रा महाजन नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. विशेष म्हणजे 2 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमध्ये आयोजित केलेल्या ‘मै भी चौकीदार’ या कार्यक्रमाला त्या अनुपस्थित राहिल्या होत्या.
सुमित्रा महाजन या इंदूर लोकसभेच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 1989 पासून सलग आठ वेळा इंदूरमधून निवडणूक लढवली आहे. 1984-85 दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौरपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुमित्रा महाजन यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि इंदूर शहराच्या महापौर मालिनी गौड यांचे नाव चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ :