मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने राज्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून खुलासा केला आहे. दरम्यान याप्रकरणी विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशात मुंडे यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले आहेत. तर काहींनी मुंडेंविरोधात तिरकस प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. (Support for Dhananjay Munde on social media After Rape Allegation)
कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांच्या पोस्ट खाली त्यांचे कार्यकर्ते, चाहते त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. तसंच आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत, अशा आशयाच्या कमेंट्स येत आहेत.
साहेब तूम्ही खूप धैर्यवान लोकनेते आहात. ब्लॅकमेल करणारे शर्मा परिवाराला मिळालेल्या नावाचा सन्मान करता आला नाही त्यांचे दुर्भाग्य आहे. आम्हाला सहज आपला हात हातात मिळाला तर आम्ही दोन दिवस हात पाण्यात सुद्धा बूडवत नाहीत.. का तर हाताला झालेला साहेबांचा कस्तूरी सुंगध निघेल म्हणून. शर्मा परिवाराने सुपारी घेऊन हवेत उडू नये ही विनंती. प्रामाणिकाचा छ्ळ करणाराला परमेश्वर सज्जा देतो, साहेब तूम्ही प्रमाणिक आहात हे सत्य जाहीरपणे मांडलं साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत…, अशी कमेंट मुंडे यांचे चाहते संजय साळवे यांनी केलीय.
साहेब… हे आम्ही जाणतो, आमचा नेता चांगलं काम करणारा, गोरगरीबांना साथ देणारा आहे. सदैव साथ व विश्वास साहेब, अशी कमेंट कृष्णा खेडकर यांनी केली आहे. तर ज्याला कोणी हरवू शकत नाही त्याला बदनाम केले जाऊ शकते. साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा भावना त्यांचा कार्यकर्ता गणेश चोले यांनी व्यक्त केलीय.
अश्या प्रकारची बदनामी करणारे कोण आहे ह्याचा शोध तरी लावा, अशी मागणी आबाजी कदम यांनी केलीय. तर धनूभाऊ अजिबात काळजी करु नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी कमेंट्स करत राजू पिसे यांनी मुंडे निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. साहेब मी तुमच्या सोबत आहे वेळेप्रसंगी अशा खोटया तक्रारी विरोधात रस्त्यावर उतरू, असं माणिक गायकवाड यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांच्या स्पष्टीकरणावरच्या पोस्टखाली शेकडो मेसेज त्यांच्या समर्थनार्थ आहेत. त्यांचे कार्यकर्ते, चाहते कमेंट करुन त्यांना समर्थन देत आहेत. तर काही लोकं मात्र धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी, तसंच त्यांच्याकडून चुकीचं काम झालंय, असं म्हणत त्यांच्याविरोधात सोशल मीडियात व्यक्त होऊ लागले आहेत.
सरकार आपलंच आहे साहेब, कशाला सफाई देता, असं म्हणत योगेश शेलार यांनी मुंडेंना टोला हाणलाय. तर पत्नीपासुन दोन अपत्ये आणि शर्मा यांच्यापासून दोन अपत्ये असे चार अपत्ये असूनही धनंजय मुंडे यांनी निवडणूक कशी लढवली? असा सवाल अमोल शिंदे यांनी उपस्थित केलाय. एकूणच धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात लोक व्यक्त होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून येत आहेत.
संबंधित बातम्या
धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांनाच पत्रं