Maharashtra Politics : फैसले की घडी! 16 आमदारांचं काय होणार?; शिंदे सरकारचं भवितव्यही टांगणीला
Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात शिंदे गट विरुद्ध शिवसेनेची केस सुरू आहे. एकूण दोन प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. एक म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेवर कोर्टाचा उद्या निकाल येणार आहे.
मुंबई: उद्याचा दिवस शिवसेनेसाठी (shivsena) अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस सेनेसाठी जसा महत्त्वाचा आहे. तसाच तो शिंदे सरकार आणि भाजपसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण उद्या शिवसेनेच्या 16 बंडखोरांच्या निलंबनावर सुनावणी होणार आहे. तसेच विधानसभेतील प्रतोद कोण हे सुद्धा उद्याच ठरणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उद्या जर 16 आमदारांचं निलंबन झाल्यास शिवसेनेसाठी उद्याचा दिवस अत्यंत मोठा असेल. त्यामुळे शिवसेनेला इतर सर्वच बंडखोरांना अपात्र करता येईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना सरकार अल्पमतात गेल्याने राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे राज्यात मध्यावधी निडवणुका होऊ शकतात. तसेच शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 40 बंडखोरांच्या करिअरचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात शिंदे गट विरुद्ध शिवसेनेची केस सुरू आहे. एकूण दोन प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. एक म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेवर कोर्टाचा उद्या निकाल येणार आहे. दुसरं म्हणजे शिंदे गटाचा प्रतोद खरा की शिवसेनेचा प्रतोद खरा यावरही उद्याच निकाल येणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालामुळे शिवसेना आणि शिंदे सरकारच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे.
16 आमदार अपात्र झाले तर काय होईल?
शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर झिरवळ यांनी या आमदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने जर या 16 आमदारांच्या बाजूने निकाल दिला तर या आमदारांची आमदारकी वाचेल. शिवाय शिंदे सरकारही मजबूत होईल. या सरकारला धोका राहणार नाही. त्यामुळे शिवसेनेकडील आमदार आणि खासदारही शिंदे गटाला मिळू शकतात. मात्र, निकाल विरोधात गेल्यास सर्व 16 आमदार अपात्रं होतील. इतर शिवसेनेचे बंडखोर आमदारही अपात्र होतील आणि शिंदे सरकार अल्पमतात येऊन कोसळेल. परिणामी राज्याला मध्यावधीला सामोरे जावे लागू शकते.
प्रतोदपद कुणाकडे राहणार?
उद्या कोर्टात प्रतोदपद कुणाकडे राहणार याचा फैसला होणार आहे. शिंदे गटाच्या प्रतोदला कोर्टाने मान्यता दिल्यास शिवसेनेची मोठी कोंडी होऊ शकते. कारण शिंदे गटाच्या प्रतोदचा व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होईल. त्यामुळे शिवसेनेच्या 14 आमदारांची आमदारकीही रद्द होऊ शकेल. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असू शकतो. जर प्रतोदपद शिवसेनेकडे राहिल्यास शिंदे सरकारची अडचण होईल. केवळ 16च नव्हे तर शिंदे यांच्याकडील शिवसेनेच्या 40 बंडखोरांची आमदारकी रद्द होऊ शकते. शिंदे यांची आमदारकीही रद्द होऊन त्यांचं सरकार कोसळू शकतं.
गळती रोखली जाईल
शिवसेनेच्या बाजूने उद्याचा निकाल आल्यास शिवसेनेमधून होणारी गळती थांबेल. शिवसेनेतील काही खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जातं. कोर्टाच्या निकालाने हे खासदार सेनेतच राहील. तसेच शिवसेनेवरील उद्धव ठाकरे यांची पकडही कायम राहील. मात्र, निकाल विरुद्ध गेला तर शिवसेनेत झपाट्याने गळती सुरू होऊ शकते, असं जाणकार सांगतात.
11 तारखेनंतर हकालपट्टी
उद्या शिवसेनेच्या बाजूने निकाल लागल्यास शिंदे समर्थक सर्व 40 आमदारांची आमदारकी जाऊ शकते. कारण शिवसेनेचा व्हीप सर्वच आमदारांना लागू होईल. मात्र, शिवसेनेच्या विरोधात निकाल गेल्यास या आमदारांची आमदारकी वाचेल. त्यामुळे या शिंदे यांच्यासह 40 आमदारांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
कुणासाठी कोणते वकील बाजू मांडणार?
शिवसेना
रविशंकर जांध्याल अभिषेक मनु संघवी कपिल सिब्बल देवदत्त कामत
शिंदे गट
हरिश साळवे मुकुल रोहतगी मनिंदर सिंह