Supriya Sule : अजित पवारांच्या बाबतीत संजय राऊतांना जे नकोय, तेच सुप्रिया सुळे करणार का?
Supriya Sule : संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकारांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं. त्यातून एकप्रकारे महाविकास आघाडी म्हणून त्यांना काय अपेक्षित आहे ते सांगितलं. आता यामध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे. राजकारण आणि कुटुंब हा पेच यामध्ये आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत अजित पवारांवर जोरदार टीका केली. रक्षा बंधनावरुन सुद्धा ते अजित पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल बोलले. “अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत. बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळलं. पण दादांना कळलं नाही. दादा राखी बांधण्यासाठी जातील, तेव्हा सुळे काय करतात हा प्रश्न आहे? बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढला आहे” अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. सुप्रिया सुळें विरोधात सुनेत्रा यांना उभं करणं चूक होती असं अजित पवार म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं.
“जे ज्ञान राज्यातल्या सामान्य जनतेला होतं. बारामतीमध्ये बहिण विरुद्ध पत्नी सामना चुकीचा आहे, हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं. पण चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही. म्हणून ते राजकारणात फिट नाहीत. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार काही करु शकतात. लोकसभेला इतका मोठा फटका बसला आहे. विधानसभेला पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला, भाऊबीजेला जातील. पण प्रश्न हा आहे की, सुप्रिया सुळे त्यावेळी काय करतील? सुप्रिया सुळेंसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढला आहे हे सुळेंनी लक्षात ठेवावं” याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.
सुप्रिया सुळे काय बोलल्या?
राजकारण आणि त्या पलीकडे असलेलं भावा-बहिणीच कौटुंबिक नात लक्षात घेऊन अजित पवार एक पाऊल पुढे आले, तरी त्यांना शरद पवार-सुप्रिया सुळेंनी साथ देऊ नये, असं अप्रत्यक्षपण संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या ‘रामकृष्ण हरी’ एवढच बोलल्या. त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं. त्यामुळे रक्षा बंधनाच्या दिवशी आता काय घडणार? हे तेव्हाच समजेल.