भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्हही दिलं असतं, वर काय घेऊन जायचं?; सुप्रिया सुळे यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात एवढ्या सहभाग घेत आहेत, याचा अर्थ महाविकास आघाडीचे हे यश आहे. पक्ष फोडून, चिन्ह चोरून घेतलं. लोकांना कॉपी करून पास झालेलं आवडत नाही. देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री झाले. बघा नियतीचा खेळ कसा असतो. दोन पक्ष फोडले आणि उपमुख्यमंत्री झाले, असा चिमटा खासदार सुप्रिया सुळे यांनी काढला.
आपल्याला पुढचे 90 दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचं आहे. त्यांना वाटतं नाते आणि लोक पैशांनी विकत घेता येतात. 50 खोके, एकदम ओके, असं खोकेवालं हे सरकार आहे. मात्र जनता ही खोकेवाली नाही, इमानदार आहे. सत्ता स्वतःसाठी नसते. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी असते. निवडणुकीच्या आधी प्रत्येक महिलेला 10 हजार रुपये देणार आहे म्हणजे प्रत्येक महिलांच्या मताची किंमत 10 हजार रुपये का?, असा संतप्त सवाल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तर भावाने मागितलं असतं तर त्याला पक्ष आणि चिन्हही दिलं असतं. वरती काय घेऊन जायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आहेत. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. सुप्रिया मला पक्ष आणि चिन्ह दे असं मला अजितदादांनी विचारलं असतं. भावाने मला चिन्ह आणि पक्ष मागितला असता तर सगळं दिलं असतं. तू मोठा आहेस. तुझा अधिकार आहे. घे तुला पाहिजे ते असं मी म्हटलं असतं. वरती काय घेऊन जायचं आहे?, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी कशी चूप बसू शकते?
मी कधीही कुणाची बदली करा, पक्षाच्या कार्यालय इकडे नको इकडे करा. असं कधी म्हटलं नाही. आज आमचा पक्ष नेला. चिन्ह नेलं. उद्या तुमच्या घरात घुसतील आणि म्हणतील ही शेती आमची आहे. कुणी काही म्हटलं तरी मी लढा देत राहणार कारण कोर्टामध्ये केस आहे. तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा घात केला तर मी कसं चूप बसू शकते? कोणीतरी लढला पाहिजे. त्यामुळे माझी ही लढाई सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.
मी थांबणार नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः पक्ष स्थापन केला. मात्र उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षासाठी कोर्टात जावं लागलं. माझं भांडण कुणाशी नाही. माझं भांडण ह्या दिल्लीतल्या अदृश्य शक्तीसोबत आहे, माझी लढाई त्यांच्यासोबत आहे आणि मी थांबणार नाही.मी जर लढू शकले तर राज्यातली प्रत्येक महिलाही स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढू शकतो असा त्याचा अर्थ होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
झुकणार नाही
एकीकडे भाऊ आणि दुसरीकडे वडील. भाऊ म्हटला, माझ्यासोबत चल. मी त्याला म्हटलं, दुसरीकडे नैतिकतेची लढाई आहे. आणि मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले. आज मला वाटतं की माझा निर्णय बरोबर होता. कधीही मी दिल्लीसमोर मुजरा करणार नाही. कष्टाने खाल्लेली अर्धी भाकर खाईल. पण तुमच्यासमोर झुकणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
त्याचा कार्यक्रम करते
भावा बहिणीचं नातं हे प्रेमाचं आणि विश्वासाचं असतं. ते पैशाचं नसतं. तुम्ही फक्त एखाद्या बहिणीचे 1500 रुपये परत घेऊन बघाच. मग ही बहीण काय करते ते बघा, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. आमचं सरकार आल्यावर तुम्हाला हमीभाव देण्याचा पहिला निर्णय आमचा मुख्यमंत्री घेईल. तुम्हाला वाटेल त्याला मतदान करा. पण तुम्हाला कोणी धमकी दिली तर मला सांगा. मी बघते त्यांचा कार्यक्रम कसा करायचा ते, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.
सरकार डर रही है
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यावरूनही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान हे वन नेशन वन इलेक्शनचा नारा देतात आणि दोनच राज्याच्या निवडणुका होतात. देशात निवडणुका होऊ शकतात. पण राज्यात निवडणुका होत नाहीत. याचा अर्थ सरकार डर रही है. सरकारला भीती वाटतेय. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार नाही. त्या नोव्हेंबरमध्ये होतील असं दिसतंय, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.