ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात; सुप्रिया सुळेंनी चंद्रकांतदादांना का फटकारले?
जोपर्यंत गुणवत्तेचे शिक्षण स्वस्त मिळणार नाही, तोपर्यंत ते काहीजणांसाठीच उपलब्ध असेल. आता देशात भुकेने कोणी मरत नाही.
सांगली: एका मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं. चेष्टेवारी न्यायचं नाही आणि चेष्टाही करायची नाही. गंमतजमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. ही काही महाराष्ट्रची हास्यजत्रा नाही. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना (chandrakant patil) फटाकरलं आहे. मीडियाशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांतदादांवर जोरदार हल्ला चढवला.
खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांच्या पगाराच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना फैलावर घेतलं. इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची? शक्य-अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे, कारण वक्तव्य त्यांनी केल आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का?, असा सवाल करतानाच ऊठसूठ महाराष्ट्रातील मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर भाष्य केलं होतं. शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांची कमतरता आहे. पण तरीही धकवलं जातंय. प्राध्यापकांची कमतरता निघून जावी म्हणून 2072 प्राध्यापकांची भरती करतोय.
प्राचार्यांच्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. ज्या ज्या महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत, तिथे भरती होणार आहे. त्या सर्व महाविद्यालयांना प्राचार्य भरण्याची मी परवानगी देत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
तुम्ही विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क का आकारता? असा माझा सवाल आहे. त्यावर आम्ही प्राध्यापकांचे पगार करतो, असं महाविद्यालयांचं म्हणणं असेल. खासगी महाविद्यालयांना मी असं म्हणेल की, तुम्ही फी कमी करा. तुमच्या प्राध्यापकांचे पगार आम्ही करतो.
आता 12 हजार कोटी रुपये प्राध्यापकांच्या पगारावर खर्च करतोय. सगळ्या खाजगी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे पगार करायचे झाले तर हजार कोटी वाढतील. आता 12000 कोटी खर्च करतोय, तर 13000 कोटी खर्च करावे लागतील. मग खासगी कॉलेजला फी कमी करावी लागेल, असं पाटील म्हणाले होते.
जोपर्यंत गुणवत्तेचे शिक्षण स्वस्त मिळणार नाही, तोपर्यंत ते काहीजणांसाठीच उपलब्ध असेल. आता देशात भुकेने कोणी मरत नाही. पण आता शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. आरोग्यावर काम करण्याची गरज आहे.
आम्ही स्वस्त आणि मस्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. ही सरकारची जबाबदारी आहे. एका बाजूने प्रायव्हेट कॉलेजच्या नावाखाली सरकारने ही जबाबदारी अक्षरशः ढकलून दिली होती. शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार हे पाप आहे, असंही ते म्हणाले.