Supriya Sule Video : ‘घाणेरडं राजकारण थांबायला हवं, पुढाकार घ्यायला तयार’, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; अॅक्टिंग करत फडणवीसांनाही टोला
सुप्रिया सुळे यांनी जळगावात बोलताना महत्वाचं वक्तव्य केलंय. घाणेरड्या पद्धतीचं राजकारण कुठेतरी थांबायला हवं. त्याबाबकत सर्वपक्षीय नेत्यांशी बोलायला आपण पुढाकार घ्यायला तयार असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.
जळगाव : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमात सोमवारी मोठा राडा पाहायला मिळाला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी इराणी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी (NCP Woman Activist) गोंधळ घातला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे केतकी चितळे प्रकरणही चांगलंच गाजत आहे. अशावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जळगावात बोलताना महत्वाचं वक्तव्य केलंय. घाणेरड्या पद्धतीचं राजकारण कुठेतरी थांबायला हवं. त्याबाबकत सर्वपक्षीय नेत्यांशी बोलायला आपण पुढाकार घ्यायला तयार असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.
‘घाणेरडं राजकारण कुठेतरी थांबायला हवं’
सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्यात केतकी चितळे असो की नवनीत राणा यांच्यासह विविध विषयावरुन राजकारण सुरु आहे. हे कुठेतरी थांबली पाहिजे. अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे. हे सर्व थांबायला हवं. त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन. भाजप नेते, मनसेचे राज ठाकरे असो की महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील मध्यस्थी करेन, मी सर्व पक्षांसोबत बोलायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवरही अंडी फेकली, शाई फेक करण्यात आली. त्याबाबत विचारलं असता अशा प्रकारची पोस्ट करणं किंवा बोलणं अत्यंत वाईट आहे. यावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासब विविध पक्षांच्या नेत्यांनी निषेध नोंदवला. त्यांचे मी आभारही मानले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे, सर्व पक्षातील नेत्यांशीही चर्चा करेल, असंही त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला, अॅक्टिंगही केली!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अयोध्या आणि बाबरीच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडी सरकारचा बाबरी ढाचा पाडणार, असा इशाराच फडणवीस यांनी दिला. त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी घाबरण्याची अॅक्टिंग करत मला खूप भीती वाटते, अशी खोचक टिप्पणी केली.