घरात सगळं आलबेल आहे, हे सांगावं लागतं, म्हणजेच पवार कुटुंबात गडबड आहे : सुरेश धस
आपल्या घरात सारं काही आलबेल आहे, असं सांगावं लागणं म्हणजे घरात गडबड असल्याचं लक्षण आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांना टोला लगावला
बीड : ‘आमच्या घरात सगळं काही आलबेल आहे, असं सांगायची वेळ का येते? याचा अर्थ शरद पवार यांच्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे’ अशा शब्दात भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर (Suresh Dhas on Sharad Pawar) हल्लाबोल केला आहे. धस यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरला होता.
‘टीव्हीला बातम्या यायला लागल्या की पवारांच्या घरात काहीतरी चाललं आहे. अमकं चाललंय, तमकं चाललंय. आणि हे इकडे तरीही आमच्यात तसं काही नाही म्हणतात. आमच्या घरात सर्व आलबेल आहे. अहो, तुमच्या घरात काही नाही चाललं, हे सांगायची पाळी का येते? काहीतरी असल्याशिवाय ही वेळ येते का?’ असा सवाल सुरेश धस करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणालाही न सांगता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
2014 ला भाजपला पाठिंबा देणं ही बिलकूल चूक नव्हती : अजित पवार
बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी रायमोह येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करताना थेट पवारांवर (Suresh Dhas on Sharad Pawar) निशाणा साधला.
‘कोणतरी म्हणालं की राज्यातले अनेक बिघडलेले पुतणे त्यांनी आपल्या घरात घेतले. म्हणून कदाचित त्यांच्या इथेही अशीच वेळ आली असेल. आपल्याकडे एखाद्या कांद्याला काही झालं, तर तो आपण बाजूला काढून ठेवतो, नाहीतर सगळ्या पोत्याचीच वाट लागते. तसं काही झालं असेल’, अशी खोचक टीकाही सुरेश धस यांनी केली.
‘जयदत्त क्षीरसागर यांच्या घराबद्दल आम्ही कल्पना देत होतो. अशा पद्धतीचे निर्णय घेऊन तुम्ही यांच्या घरामध्ये रॉकेल ओतण्याचं काम करताय. हे नम्रपणे मी पुण्याच्या मंगल कार्यालयात मी सांगितलं होतं. तसं करु नका. पण तसं झालं. मधल्या कालावधीत त्यांनी कसे अडचणीत दिवस काढले, त्याचा साक्षीदार मी आहे’, असंही सुरेश धस म्हणाले.
बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर मंत्री जयदत्त क्षीरसागर उभे राहिले आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनाच मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे मुंडे भावा-बहिणीप्रमाणेच क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये रंगणारी बीडमधली ही दुसरी लढतही रंगतदार होणार आहे.