मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचा बडा नेता? फोटो समोर येताच खळबळ
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचा नाशिकमधील एक बडा नेता पार्टीत नाचल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी आज केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक फोटो जारी करत भाजपवर निशाणा साधला.
नाशिक | 15 डिसेंबर 2023 : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यावेळी त्यांनी एका व्हिडीओचा दाखला दिला. नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो दाखवले. तसेच पार्टीत नाचण्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. नितेश राणे यांनी केलेले आरोप बडगुजर यांनी फेटाळले आहेत. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या आरोपांवरुन मोठा दावा केला आहे.
नितेश राणे यांनी आरोप केलेल्या पार्टीत भाजप नेते देखील सहभागी होते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. या पार्टीत भाजप नेते गिरीश महाजन, देवयानी फरांदे उपस्थित होत्या, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांनी फोटोही जारी केलाय. तसेच आपण पूर्ण व्हिडीओच माध्यमांना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, भेट झाली असेल किंवा मॉर्फ केलेले फोटो किंवा व्हिडीओ असतील, असं स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिलंय.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
“नितेश राणेंनी फोटो झळकवले, आमच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई व्हावी, पण यामध्ये जे तीन महत्त्वाची नावे आहेत त्यामध्ये भाजप नेते आहेत. मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर आणि भाजप आमदार बाळासाहेब सानप हे एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसत आहेत. मी आख्खा व्हिडीओ माध्यामांना देईन”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
‘अंधारेंचा पक्ष तर झाडून त्या लग्नाला होता’
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते विक्रम चांदवडकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. “हा लग्न सोहळा 2016 किंवा 2017 चा असावा. हा लग्न सोहळा ज्यांच्या घरी होता ते नाशिकचे शहर-ए-खतीब यांच्या नातवाचा होता. शहर-ए-खतीब हे मुस्लीम समाजात एक आदराचं पद आहे. त्यांच्या नातवाचा विवाह होता. त्या विवाहासाठी आम्ही गेलो होतो. सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी होते. शासकीय अधिकारीदेखील उपस्थित होते. अनेक जण उपस्थित होते”, असं विक्रम चांदवडकर यांनी सांगितलं.
“सुषमा अंधारे यांनी दाखवलेला फोटो त्या लग्नात जेवण करत असतानाचा व्हिडीओ आहे. मला सुषमा अंधारे यांना या निमित्ताने सांगायचं आहे, ज्यावेळेला हा लग्न सोहळा झाला त्यावेळेला तुम्ही पक्षातही नव्हता. तुम्ही त्यानंतर या पक्षात आला. तुम्ही आज ज्या पक्षासाठी भू्मिका मांडत आहात तो पक्ष झाडून त्या लग्नाला होता”, अशी प्रतिक्रिया विक्रम चांदवडकर यांनी दिली.
सुषमा अंधारे बघा काय म्हणाल्या?
सुधाकर बडगुजर पोलिसांच्या चौकशीसाठी दाखल
नितेश राणे यांनी आरोप केलेल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी स्थापन करुन चौकशी केली जाईल, अशा घोषणा केली. त्यानंतर पोलीस कामाला लागले आहेत. नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी येण्याचा निरोप दिला. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने बडगुजर यांना चौकशीसाठी बोलवले. विशेष म्हणजे सुधाकर बडगुजर हे कामानिमित्त मुंबईच्या दिशेला रवाना झाले होते. पण पोलिसांचा निरोप मिळाल्यानंतर सुधाकर बडगुडर नाशिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांची चौकशी करत आहेत.