बाहेरची बनारसी अन् घरची उपाशी, भाजपमध्येच धुसफूस; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल सुरूच
मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला.
पुणे: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्येच धुसफूस सुरू आहे. किरीट सोमय्या कष्टाळू आहेत. वाशिमला गेले. पुण्यात मार खाल्ला. किती कष्ट. त्यांना मंत्रिपदच द्यायला हवं. केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि पंकजा मुंडे यांना काय दिलं? बाहेरची लेकरं येतात त्यांना आंगडंपांगडं. स्वत:ची लेकरं मात्र उपाशी. भाजपचं म्हणजे बाहेरची बनारसी आणि घरची उपाशी, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
राज्यातील शिंदे सरकार अधिकाळ चालणार नाही. हे सरकार 2023ला पडणार आहे. त्यानंतर राज्यात निवडणुका लागतील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
आमच्याकडून जे 40 आमदार गेले. त्यांचा बायोडेटा चेक करा. त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा उड्या मारल्या आहेत. त्यांची तशी फितरतच आहे. सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, असा हल्ला त्यांनी चढवला.
यावेळी त्यांनी जळगावचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. चिमण आबांचं वय 73 आहे. त्यांना सभेत उचलून धरावं लागतं. तिथे गेले की थुईथुई करतात. हा चमत्कार कशाचा आहे. सत्तेचाच, असा टोला त्यांनी लगावला.
मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला. तिकडे गेले आणि गब्बर झाले. जागा कशी घेतात? पैसे कुठून येतात? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी गालिबचा शेर ऐकवला. कल हमारी दिवार क्या गिरी, लोगोने रास्ता बदल दिया, असं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एवढं सगळं करणं हमारे बस की बात नव्हती. पडद्यामागचे कलाकार फडणवीस.
चंद्रकांत पाटील तर म्हणे आम्ही मनावर दगड ठेवला आणि संधी दिली. आमची वहिनीबाई फार बोलतात. देवेंद्रजी हुडी घालू जायचे. मला पण माहिती नसायचं कुठे जातात, असं अमृता वहिनी सांगायच्या, असा टोला त्यांनी लगावला.
तुम्हाला काही अडचण होती. तर तुम्ही 40 जणांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायचं होतं. पक्षप्रमुख चुकत आहेत हे पत्रकार परिषदेत सांगायचं होतं. ते का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला.