Karnataka : आठवडाभरात पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जातो, कोणी दिला राज्य सरकारला अल्टिमेटम?
Karnataka : सीमावर्ती भागातील पाणी प्रश्न दुर्लक्षित करणं राज्य सरकारला जड जाणार असल्याचे चित्र आहे..
सांगली : सीमावर्ती भागातील पाण्याचा प्रश्न (Water Crisis) सातत्याने दुर्लक्षित केल्यानं राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. बेळगाव, निपाणी, भालकी येथील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार (Karnataka) गळचेपी करत आहे. पण राज्यातील सीमावर्ती भागातील गावांची परिस्थिती त्याहूनही बिकट असल्याचे या सीमावादावरुन प्रकर्षाने समोर आले आहे. पाणी आणि इतर मुलभूत सुविधांसाठी अद्यापही या भागातील लोकांना संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भाडंणात फायदा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. आता या मोक्यावर गावकऱ्यांनी चौका मारला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील अनेक गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला. त्यावरुन टिकेची झोड उठवली. राज्यकर्ते आणि विरोधकांनी बोम्माई यांच्यावर तोंडसूख घेतले.
पण मुळ पाणी प्रश्नाचा मुद्या उपस्थित होताच, सीमावर्ती गावांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे. आता तर जत तालुक्यातील 40 गावांनी पाणी पुरवठा न केल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.
सीमावर्ती भागातील गावांमधील सोयी-सुविधांबाबत सरकारची उदासीनताही यामुळे उघड झाली आहे. पाणी प्रश्न एका आठवड्यात सोडविण्याचा अल्टिमेटम या गावांनी दिला आहे. जत तालुका पाणी कृती समितीने पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे.
बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती. एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली.
महाराष्ट्राच्या हद्दीतील कर्नाटक सरकारच्या या खोडसाळपणामुळे राज्य सरकारसह विरोधकही खडबडून जागे झाले. पण बोम्मई काही थांबले नाहीत. त्यांनी जत तालुक्यावर, अक्कलकोटसह सोलापूरवर हक्क सांगितला.
कर्नाटक सरकारने दावा सांगितल्यानंतर जो मदत करेल, पाणी प्रश्न सोडवले, त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय जत तालुक्यातील पाणी कृती समितीने घेतला आहे. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडविल्यास थेट कर्नाटकात सामील होण्याचा इशाराच समितीने राज्य सरकारला दिला आहे.