Telangana Election Result : काय ‘राव’ तुम्ही… महाराष्ट्र जिंकायला निघाले; तेलंगणा गमावण्याची वेळ?
तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. तेलंगणातील 119 जागांचे सुरुवातीचे कलही हाती आले आहेत. या निकालात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसून आलं आहे. तर सत्ताधारी बीआरएस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बीआरएसला 50 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 61 जागा मिळताना दिसत आहेत.
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : चार राज्यांचे कल हाती येत आहेत. या चारही राज्यांपैकी राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसत आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे तेलंगणात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्ताधारी बीआरएसची तेलंगणात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. तर काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नांवर बोळा फिरवत कलांमध्ये बहुमतांचा आकडा मिळवला आहे. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र जिंकायला निघाले होते, पण त्यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ आली आहे.
तेलंगणाच्या 119 विधानसभा जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला 47 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 62 जागा मिळताना दिसत आहे. भाजपला 5 आणि एमआयएमला 4 जागा मिळताना दिसत आहे. भाजप आणि एमआयएमला सोबत घेतलं तरी चंद्रशेखर राव यांना तेलंगणाची सत्ता राखता येणार नाहीये. तर काँग्रेसला सत्तेसाठी कुणालाही सोबत घेण्याची गरज पडणार नसल्याचं चित्र आहे.
चंद्रशेखर राव कुठे चुकले?
गेल्या वर्षभरापासून चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हातपाय रोवायला सुरुवात केली होती. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला होता. महाराष्ट्रातील काही नेत्यांना हाताशी धरून पार्टी बांधण्यास सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून तर त्यांचे महाराष्ट्रातील दौरे अधिकच वाढले होते. तेलंगणाची निवडणूक तोंडावर असतानाही चंद्रशेखर राव यांनी तेलंगणावर फोकस ठेवण्याऐवजी महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष दिलं होतं. तिथेच चंद्रशेखर राव चुकले. ज्या राज्यात निवडणुका नाही, जिथे सत्ता येण्याची शाश्वती नाही आणि ज्या राज्यातील एकही मोठा नेता गळाला लागलेला नाही तिथे म्हणजे महाराष्ट्रात चंद्रशेखर राव यांनी अधिक फोकस केला.
महाराष्ट्रातील वृत्तपत्रात तेलंगणाच्या कामाच्या जाहिराती दिल्या. सभा घेतल्या. त्यात वेळ गेला आणि तेलंगणाकडे दुर्लक्ष झालं. मुख्यमंत्री तेलंगणात कमी आणि महाराष्ट्रात ज्यादा असं चित्र निर्माण झालं. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा तेलंगणात राबता सुरू झाला. त्यांना वेळ दिला जाऊ लागला. तेलंगणातील बीआरएसच्या कार्यकर्त्यांवर दुर्लक्ष झालं अन् त्यामुळेच चंद्रशेखर राव यांच्या हातून सत्ता गेल्याचं सांगितलं जातं.
तेलंगणातील विकासकामांकडे दुर्लक्ष
चंद्रशेखर राव यांनी जाहिरातीतून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी भरपूर कामे केल्याचं दाखवलं. पण प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलला रिअॅलिटी वेगळी होती. तिथल्या गोरगरीबांचे प्रश्न सुटलेले नव्हते. अनेक समस्या होत्या. पिण्याच्या पाण्यापासून वीज ते शेतीच्या प्रश्नांपर्यंत अनेक समस्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारांनी त्याचा राग ईव्हीएममधून व्यक्त केला, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
काँग्रेसची हवा… कळलंच नाही
विशेष म्हणजे चंद्रशेखर राव आणि त्यांचे मंत्री महाराष्ट्रात वारंवार जात असल्याने नागरिकांमध्ये रोष होता. त्यांचा हा रोष काँग्रेसने हेरला आणि ग्राऊंड लेव्हलवर काम करण्यास सुरुवात केली. मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. आंदोलने सुरू केली. संपर्क वाढवला. त्यामुळे चंद्रशेखर राव यांच्या विरोधातील रोषाला अधिकच खतपाणी मिळालं. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसची हवा निर्माण होतेय हे हेरण्यात चंद्रशेखर राव कमी पडले आणि अखेर बीआरएसची वाईट परिस्थिती झाली.