Karnataka : सावरकरांच्या पोस्टरवरून कर्नाटकातील शिवमोग्गा येथे तणाव, काही भागात संचारबंदी, चौकाच्या नामकरणावरून वाद
मेंगळुरू शहराच्या उत्तरेकडील भाजपचे आमदार वाई भारत शेट्टी यांच्या मागणीवरून चौकाचे नामकरण सावरकर ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
कर्नाटकच्या शिवमोग्गा (Shivamogga ) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त अमीर अहमद सर्कलमध्ये वीर विनायक सावरकर यांचा पोस्टर लावल्यानंतर वाद निर्माण झाला. मुस्लीम युवकांनी सावरकर यांच्या पोस्टरला विरोध केला. हिंदू समर्थकांनी सावरकर यांचा पोस्टर लावला होता. पोस्टर हटविल्यानंतर हिंदू समर्थकांनी आंदोलन केलं. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी शिवमोगा जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी (curfew) लागू केली. याशिवाय मेंगळुरूच्या सुरतकल चौकाचे नाव सावरकर ठेवण्याचा पोस्टर हटविण्यात आला. सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या कार्यकर्त्यांनी पोस्टरला विरोध केला. एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी सावरकर चौकाच्या नावानं लावलेल्या पोस्टरला विरोध केला. महापालिका आयुक्त अक्षय श्रीधर यांनी पोस्टर हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी सायंकाळी पोस्टर हटविण्यात आले.
भाजप आमदारांनी नावाचा ठेवला होता प्रस्ताव
मेंगळुरू शहराच्या उत्तरेकडील भाजपचे आमदार वाई भारत शेट्टी यांच्या मागणीवरून चौकाचे नामकरण सावरकर ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. महापालिका सरकारच्या मंजुरीसाठी वाट पाहत होती. मनपा आयुक्त श्रीधर यांनी सांगितलं की, महापालिकेनं या चौकाचं नामकरण सावरकर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु, सरकारी स्तरावर अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तक्रारीवरून पोस्टर हटविण्यात आलं. सुरतकल चौक संवेदनशील आहे. त्यामुळं हा विषय पोलिसांपर्यंत नेल्याचं एसडीपीआयचं म्हणणं आहे. एसडीपीआय या चौकाचं नामकरण सावरकर ठेवण्याच्या विरोधात आहे.
सिद्धारमय्यांनी सावरकरांवर केला होता हल्लाबोल
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धारमय्या यांनी ट्वीट करून सावरकरांवर हल्लाबोल केला होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांची कठपुतळी बाहुली म्हणून सावरकर काम करत असल्याचा आरोप केला होता. इंग्रज गेल्यानंतर आमची गुलामीतून सुटका झाली असल्याचं ते म्हणाले. आरएसएस गुलाम असल्याच्या टीकेला मुख्यमंत्री बोम्मई यांनी उत्तर दिलं. जाहिरातीत पंडित जवाहरलाल नेहरु यांना स्वतंत्रता सैनानीच्या यादीत सहभागी करण्यात आलं नाही. यावरूनही काँग्रेसनं आरोप केलाय.