मोठी बातमी ! पालघरमध्ये ठाकरे गटाला तर सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार; शिंदे गट राज्यात बळकट होतोय?
कोणत्याही अपेक्षेने शिंदे गटात जात नाही. शरद पवार यांच्या भेटीनंतरही कोर कमिटीत स्थान मिळाले नाही. तरीही मी नाराज नव्हतो. मात्र पक्षातील माझ्या समर्थकांना डावलले जात होते.
सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होऊन वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदही मिळवलं. राज्याच्या राजकारणात शिंदे गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. ठाकरे गटाबरोबरच राष्ट्रवादीचे नेतेही शिंदे गटात येत आहे. आज पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. पालघरपाठोपाठ सोलापुरातही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यात शिंदे गट प्रभावी ठरतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले निष्ठावंत शिवसैनिक आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येऊन दाखल होत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील आजी माजी शिवसेना पदाधिकारी आता हळूहळू शिंदे यांना समर्थन देऊन पक्षात प्रवेश करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचही जिल्ह्यातील बळ अधिक वाढलं आहे.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज करणार शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे. पक्षातील स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन कोल्हे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही अपेक्षेने शिंदे गटात जात नाही. शरद पवार यांच्या भेटीनंतरही कोर कमिटीत स्थान मिळाले नाही. तरीही मी नाराज नव्हतो. मात्र पक्षातील माझ्या समर्थकांना डावलले जात होते. त्यामुळे अखेरीस मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असं दिलीप कोल्हे यांनी सांगितलं.
आमच्या मिल कामगारांचा मागील पंधरा वर्षापासून लढा सुरू आहे. मात्र पक्षातील लोकांनी सत्तेत असतानाही दुर्लक्ष केले. मात्र मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे काम झटक्यात मार्गी लावण्याचा आश्वासन दिले. त्यामुळेच आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करतोय, असं त्यांनी स्पष्ट केलं.