Badlapur News : अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर….सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
Badlapur News : "ज्या पालकांनी न्याय मागितला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता आणि जो वामन म्हात्रे घाणेरडी टिप्पणी करतो, त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता लोकांनी शांत बसलं पाहिजे" अशा शब्दात सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला.
“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना विषय हाताळता येत नाही. त्यामुळे त्यांना हिमालयात पाठवा. गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करा. गिरीश महाजन एवढे शहाणे, गुणी असतील तर त्यांना मुख्यमंत्री करा” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी महिला अत्याचाराच्या विषयावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मागच्या 10 वर्षात साडेसात वर्ष गृहमंत्री आहेत” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. काल पोलिसांनी लाठीचार्ज केला. पालक जखमी झालेत. काहींना अटक झाली. या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, “ज्या पालकांनी न्याय मागितला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करता आणि जो वामन म्हात्रे घाणेरडी टिप्पणी करतो, त्याला सोडून देता आणि अपेक्षा करता लोकांनी शांत बसलं पाहिजे”
“वामन म्हात्रेला अटक केली नाही. प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता. वामन म्हात्रेंना वेगळी ट्रीटमेंट का? शिंदेंच्या जवळचा आहे म्हणून. आम्ही राजकीय उद्देशाने करतो असं मुख्यमंत्री म्हणतात. नाशिकला रामगिरी महाराजाला जाऊन भेटायची काय गरज होती. ज्यांच्यामुळे दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली, त्यांना सरकार पाठिशी घालतं” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
….तर नितेश राणेने थयथयाट केला असता
“अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आली असती? पोलीस कमिशनर डुमरेंना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले? आशुतोष डुमरेंच काय करणार ?” असे प्रश्न त्यांनी विचारेल.