Sanjay Raut | आघाडीचा पोपट मेलाय?, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut | "सोलापूर आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर उभे होते. त्यांच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडले. त्यांच्यात पाडण्याची ताकद आहे. ती जिंकण्यात परावर्तित करायची आहे. वंचितची अनेक मतदारसंघात ताकद आहे. जिंकून येण्याची क्षमता आहे" असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : “माइंड गेम असण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तीन वर्षापासून एकत्र आहे. सत्तेत एकत्र होतो. आता विरोधातही एकत्र आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील करून घ्या, इंडिया आघाडीत सामील करून घ्या म्हटलं. आमचीही तीच भूमिका आहे. लोकशाही संकटात आहे. त्यांच्या रक्षणासाठी जागृती करण्याचं काम बाबासाहेबांचे नातू करत आहेत. त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आंबेडकर यांच्या इच्छेनुसार त्यांना आम्ही सोबत घेतलं आहे. चर्चेत ते असतात. शिवसेना आणि वंचितची युतीही आमची झालेली आहे” असं संजय राऊत म्हणाले. “लोकसभा जागा वाटपाबाबत अंतिम मसुदा तयार होतोय. अंतिम चर्चा झाली. आता बैठका होणार नाही. चौघांच्या डोक्यात कोण कुठे लढणार हे क्लिअर आहे. अमूक जागा लढणार तमूक जागा लढणार हा आकडा हा मुद्दा नाही. तुम्ही किती जागा जिंकू शकता, आम्ही किती जिंकू शकतो, जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे. ओरबाडून घेणार नाही. भाजपने आमच्याकडून नेहमी ओरबाडून घेतलं” असं संजय राऊत म्हणाले.
“वंचितने 27 जागा मागितलेल्या नाहीत. 27 जागांवर त्यांनी तयारी केली आहे. त्यांचं कॅडर आहे. आघाडी किती जागा देऊ शकते, असं त्यांनी विचारलं. विचारणं हे रास्त आहे. त्यांनी पत्रातून जागा मागितल्या नाहीत. प्रकाश आंबेडकर यांची अंतिम बैठकीला यायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासोबत बैठक घेण्याची प्रकाश आंबेडकर यांची इच्छा आहे” असं संजय राऊत म्हणाले. “प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत यायचं आहे. त्यांना मायावतीप्रमाणे वेगळा मार्ग स्वीकारायचा आहे, असं वाटत नाही. सध्याच्या सरकारकडून संविधान, कायदा आणि लोकशाही बाबत ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्यामुळे आंबेडकरी समाज अस्वस्थ आहेत. हुकूमशाही सहन करायची नाही, असं समाजाचं म्हणणं आहे. नेत्यांवर दबाव आहे. त्यामुळे सर्व नेते महाविकास आघाडीसोबत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुणीही भाजपची सुपारी घेऊन येणार नाही. प्रकाश आंबेडकर या प्रकारचे नेते नाहीत. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका स्पष्ट आहे” असं संजय राऊत म्हणाले.
आघाडीचा पोपट मेला का?
“मुळात पोपट झालेलाच नाही. आमची युती आहे. आमच्यासोबत सर्व डावे पक्ष आहेत. आंबेडकर यांच्या भूमिकेवरून निष्कर्ष काढू नका. आंबेडकर आमच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आधी लढलो आहोत. त्यांची आघाडीत यायची इच्छा होती. त्यामुळे त्यांना सोबत घेतलं. सन्माने चर्चा केली आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र स्वीकारलंय. एकमेकांच्या मदतीने जिंकायचं आहे. उत्तम उमेदवार हवा, उत्तम बांधणी हवी, लोकांमध्ये मतदारसंघात बेस हवा, केडर हवा. सीट टू सीट आम्ही विचार केला आहे. आम्हाला जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. आम्ही महाविकास आघाडीत मोठी झेप घेऊ” असं संजय राऊत म्हणाले.
त्यांची पाडण्याची ताकद, जिंकण्यात परावर्तित करायचीय
“महाविकास आघाडी म्हणून विचार होतो. व्यक्तीगत स्वरुपाच्या कागदावर विचार होणार नाही. आंबेडकरांना किती जागा द्यायची हे 5 किंवा 6 तारखेला मिटिंग होईल. त्यात ठरवू. महाराष्ट्रात अनेक जागा आहेत, त्यात वंचित जिंकू शकेल. सोलापूर आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर उभे होते. त्यांच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडले. त्यांच्यात पाडण्याची ताकद आहे. ती जिंकण्यात परावर्तित करायची आहे. वंचितची अनेक मतदारसंघात ताकद आहे. जिंकून येण्याची क्षमता आहे” असं संजय राऊत म्हणाले.