Sanjay Raut | ‘….मग मोदी मणिपूरला जाऊन थांबले असते’, संजय राऊत यांचं महत्त्वाच वक्तव्य
Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत, म्हणून त्यांच्यावर सतत टीका होत असते. मणिपूरमध्ये आजही हिंसाचार सुरु आहे. आता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करताना महत्त्वाच वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : “महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच राज्य आहे. 48 लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाबरोबर जे दोन फुटीर गट आहेत, ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात, मिंधे गट आणि फजिती गट या दोन्ही गटांना सोबत घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाहीय. लोकसभेच्या पाच जागा तरी मिळणार आहेत का? अशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळे पंतप्रधानांना येथे सातत्याने प्रचारासाठी यावे लागत आहे” असं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
“उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या राम मंदिराच्या दृष्टीने प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन राजकीय प्रचार करत आहेत. त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा धसका घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा धसका घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला हा धसका आहे आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रेचा हा धसका आहे. म्हणून 48 जागेवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील” असं संजय राऊत म्हणाले.
मग, मोदी मणिपूरला जाऊन थांबले असते
“मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतय” असा दावा संजय राऊत यांनी केला. “मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या मणिपूर त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
म्हणून या दोन राज्यांवर सर्वात जास्त लक्ष
“प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो. उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहेत, 85 जागा आहेत महाराष्ट्रात 48 जागा आहेत म्हणून त्यांच या दोन राज्यांवर जास्त लक्ष आहे” असं संजय राऊत म्हणाले. “प्रधानमंत्री यांनी मणिपूरला जायला हवं, प्रधानमंत्री यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं, लडाखला देखील जायला हवं, तिकडे चीन घुसला आहे, प्रधानमंत्री यांनी लक्षद्वीप जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाशी भांडण केलं” अशी संजय राऊत यांनी टीका केली.