ठाकरे गटाचा मोर्चा अडवला, खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी
आमच्या शिष्टमंडळात आमदार, खासदार आणि शिवसेनेचे नेते मंडळी होते. एमके मडवींच्या सौभाग्यवतीही होत्या. आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई: पोलिसांकडून (police) सुरू असलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाच्या शिवसेनेने (shivsena) आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर प्रचंड मोर्चा काढला. खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार सामील झाले होते. मात्र, या मोर्चाला वादाचं गालबोट लागलं. पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर मोर्चा आला असता मोर्चेकऱ्यांना आतमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे राजन विचारे संतापले. त्यांच्यात आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
ठाकरे गटाने बेलापूर येथे आधी सभा घेतली. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे कूच केली. राजन विचारे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव आणि संजय पोतनीस सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर आला. तेव्हा विचारे यांनी आम्हाला आत सोडा असा आग्रह धरला. राजरोसपणे दडपशाही करू नका. आता तरी आत सोडा असं विचारे म्हणाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.
तुम्ही आता जाऊ शकता. पण तुमच्यासोबतचे कार्यकर्ते आत जाऊ शकत नाही, असं पोलीस म्हणाले. पण कार्यकर्त्यांसह आत जाण्याचा विचारे यांनी आग्रह धरला. त्यामुळे विचारे आणि पोलिसांत चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, सोबत नवी मुंबई बेलापूर संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे आणि ऐरोलीचे अध्यक्ष द्वारकानाथ भोईर असल्याचं कळल्यावर पोलीस नरमले आणि त्यांनी सर्वांना आत सोडले.
दरम्यान, विचारे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांसोबतची भेट समाधानकारक झाल्याचं त्यांनी सांगितलं. पोलीस आयुक्तांना सर्वांच्या वतीने निवेदन दिलंय. फॅक्ट्स सांगितल्या. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. तडीपार, चॅप्टर केस, नोटिसा देण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळली पाहिजे. म्हणून आम्ही धडक मोर्चा आणला. पोलीस आयुक्तांना लेखी अर्ज दिला, असं विचारे म्हणाले.
पोलिसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. एमके मडवींना नोटीस निघाली होती. त्यांना तडीपार केलं होतं. उपजिल्हाप्रमुख हळदणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आमच्या पक्षात या नाही तर त्रास देऊ असं सांगितलं जात होतं. पोलिसांकरवी हे सुरू होतं. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, असं ते म्हणाले.
आमच्या शिष्टमंडळात आमदार, खासदार आणि शिवसेनेचे नेते मंडळी होते. एमके मडवींच्या सौभाग्यवतीही होत्या. आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील डीसीपी पानसरे हे मिंदे गटाचे समर्थक आहेत. त्यांनी डीसीपीचं पद काढावा आणि समर्थक म्हणून बोर्ड लावून कारवाई करावी. विजय साळवी, मडवी यांना नोटिसा दिल्या. ठाण्यात कहर केला. ठाण्यात पोलीसच नाही. सर्व पोलीस यांच्या संरक्षणासाठी आहे. भाजी आणणाऱ्यांनाही संरक्षण दिलं. पीएला दिलं. नगरसेवक नाहीत त्यांनाही संरक्षण दिलं. अरे एवढी भीती आहे तर अशी कामे करता कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी केला.