ठाकरे गटाच्या आमदारांशी बोलणी सुरू, लवकरच काही आमदार शिंदे गटात; शंभुराज देसाई यांनी बॉम्बच टाकला
लोकांच्या दारात गेलं पाहिजे हे आम्ही त्यांना सांगत होतो. आम्ही तर जातच होतो. पण तुम्हीही जावं, असं आम्ही सांगत होतो. पण त्यांना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हतं.
पुणे: ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. हे आमदार आणि खासदार (एमपी) शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेला असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या आमदारांशी (एमएलए) बोलणी सुरू आहे. हे आमदार आमच्या पक्षात यायला तयार आहेत, असा दावा शंभुराज देसाई यांनी करून एकच खळबळ उडवू दिली आहे.
शंभुराज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमची त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील. ठाकरे गटात आमदार नाराज आहेत, असं सांगतानाच शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहिलं असं वाटत नाही, असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणीच्या दौऱ्यावरही टीका केली. आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते. त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता होती. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या शब्दाला किंमत होती. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होतं. तरीही ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, अशी टीका त्यांनी केली.
लोकांच्या दारात गेलं पाहिजे हे आम्ही त्यांना सांगत होतो. आम्ही तर जातच होतो. पण तुम्हीही जावं, असं आम्ही सांगत होतो. पण त्यांना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हतं. आता सत्ता गेल्यावर उसणं आवसान आणलं जात आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
तुमच्या काळात अतिवृष्टी झाली. तेव्हा तुम्ही एनडीआरएफच्या निकषाने मदत केली. आम्ही एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत केली. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तरीही आम्ही मदत केली. तुम्ही उसणं आवसान आणून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहात. ते शेतकरी पाहात आहेत, असंही ते म्हणाले.