देवेंद्र फडणवीस हे मोदी यांची थुंकी झेलून म्हणतात… दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून सडकून टीका
चीन, मणिपूरवर मोदी बोलत नाहीत. त्यांची पिपाणी फक्त विरोधी पक्षांची सरकार आहे तिथेच वाजते. ही इतिहास पुरुषांची लक्षणे नाहीत, असा चिमटा दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
मुंबई : काँग्रेस म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार है, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातून केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेस लूट की दुकान नाहीये तर भाजपच लूट कि दुकान आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाच्या लुटीचा माल घेऊन भाजप आपलं घर का भरत आहे? असा सवाल करतानाच भाजप हाच राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून भाजप बदनाम झाला आहे, असा घणाघात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. या अग्रलेखातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाघाती टीका करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस हे मोंदींची थुंकी झेलून मी पुन्हा येईन, असं म्हणालो होतो. पण येताना दोघांना घेऊ आलो, असं म्हणत आहेत. हे दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. या दोघांवरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे मी येताना भ्रष्टाचार आणि लुटीचा माल घेऊन असं फडणवीस यांना म्हणायचं आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
केसीआर यांच्या पक्षाची भीती वाटते
या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. आठ दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचा सर्वात भ्रष्टाचारी पार्टी म्हणून मोदींनी उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला लगेच मांडीवर घेतलं. त्याच सभेत केसीआर सरकारही भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप केला. आता आम्हाला केसीआर यांच्या पक्षाची भीती वाटते. कारण मोदी ज्यांना भ्रष्टाचारी ठरवतात तेच पक्ष किंवा नेते भाजपचे सत्तेतील मित्र पक्ष बनलेले असतात, असा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
मोदी दुतोंडी
भाजपला सत्ता चालवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी चोराचां गरज आहे काय? या चोरांची निवड करण्यासाठी भाजपने एखाद्या राष्ट्रीय समितीचे गठन केलेले आहे काय? मोदींनी आपल्या प्रतिष्ठेचे अजिबात भान ठेवलेले नाही. येत्या काळात तेलंगणात निवडणुका आहेत, त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर टीका केली आहे, असं सांगतानाच देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत. मात्र, तेलंगणात निवडणुका असल्याने तिथल्या दलित मतदारांबाबत कळवळा दाखवत आहेत, असा हल्लाही अग्रलेखातून करण्यात आला आहे. याच अग्रलेखातून मोदी दुतोंडी असल्याचं म्हटलं आहे.
भाजप हा लूट का मॉल
काँग्रेस लूट की दुकान असेल तर भाजप हा लूट का मॉल आहे. ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही, तिथली सरकारं केंद्राने पाठवलेला पैसा हडप करतात असा मोदींचा दावा आहे. पण राहुल गांधी यांनी अदानी यांनी हडप केलेल्या पैशाबाबत मोदी बोलायला तयार नाही, असा चिमटाही काढण्यात आला आहे.