मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला. शिरसाट यांनी मीडियासमोरच हा सल्ला दिला. शिरसाट यांच्या या सल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. यावरून विरोधकांनी आता शिंदे गट आणि भाजपला चांगलंच घेरलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर 105 आमदार निवडून आणणाऱ्या फडणवीसांवर भाजपने अन्याय केल्याचं म्हणत फडणवीस यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. तर फडणवीस यांचा हरकाम्या करून त्यांची लायकी काढल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस, त्यांची कॅपेसिटी, शिंदे गटाची विधान आणि अजित पवार गट आणि भाजपला लागलेले मुख्यमंत्रीपदाचे वेध यावरून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. तसेच संजय शिरसाट यांच्या विधानावरून तर सामनातून शिंदे गटाच्या अक्षरश: चिंधड्या उडवण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांची कॅपेसिटी असताना त्यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचले. त्यानंतर त्यांना कॅपेसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली हे बरं नाही, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची गरज दिल्लीत आहे असं शिंदे गट म्हणतोय. देशात मणिपूरपासून काश्मीरपर्यंत अनेक प्रश्न आहेत. चीनी सैन्यही सीमा भागात घुसले आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्याची फडणवीस यांची कॅपेसिटी आहे. हे प्रश्न सोडवण्यात मोदी आणि शाह अपयशी ठरले आहेत. फक्त फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याची कॅपेसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. छगन भुजबळांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर शिंदे गटाला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत असं वाटत आहे. म्हणजे राज्यात या क्षणाला तीन तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत. पण घोडा काही पुढे सरकायला तयार नाही, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील यत्किंचित लोक देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीस यांच्यावर काय वेळ आली आहे? या प्रकरणात तर फडणवीस यांची लायकीच निघाली आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे. शिंदे- पवार प्रकरणात भाजपची फजीहत झाली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमकही साफ उतरली आहे. फडणवीस यांच्या चेहऱ्यावर विफलता आणि निराशा साफ दिसत आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातूनही ते जाणवत आहे. नागपूर लोकसभा आणि विधानसभेत भाजपचा पराभव होण्याची चिन्हे दिसत आहे, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. कारण कर्तबागर माणसांचे पंख छाटायचे आणि गरुडांच्या चिमण्या करायच्या हे दिल्लीचे धोरण आहे, असं सांगतानाच संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि कायदामंत्रीपदावर लोक आहेत की नाही? असा सवालही करण्यात आला आहे.