खेळ अजून संपलेला नाही, ठाकरे गटाचं मोठं पाऊल, रवींद्र वायकर आता काय उत्तर देणार?
रवींद्र वायकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळाली. यानंतर आता ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना अडचणीत आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
राजकारण म्हटलं की एका बाजूकडून दुसऱ्या बाजूवर कुरघोडी करणं हे आलंच. राजकारणात कुणीही एकमेकांचं कायमचं शत्रू किंवा कुणीही एकमेकांचं कायमचे मित्र देखील असू शकत नाही. गेल्या चार वर्षांपासूनच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी हेच दर्शवत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील गेलं आहे. उद्धव ठाकरे यांचे अनेक जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असणारे नेते रवींद्र वायकर यांनीदेखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीदेखील देण्यात आलीय. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिंदे गटाने दुप्पट धक्का दिलाय. शिंदेंच्या या राजकीय चालीनंतर आता उद्धव ठाकरे यांनीदेखील दुसरी रणनीती आखली आहे.
रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. रवींद्र वायकर यांना ठाकरे गटाने नोटीस पाठवली आहे. रवींद्र वायकर हे आमदार आहेत. ते ठाकरे गटाचे आमदार आहेत. पण त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय. तसेच ते शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये? अशी नोटीस ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना पाठवली आहे.
दुसरीकडे माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत, असं रवींद्र वायकर म्हणाले आहेत. ठाकरे गटात असताना मला वाचवायला हवं होतं. पण तसं झालं नाही, असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला. एखाद्यावर आरोप झाले तर कुटुंब त्याच्यासोबत असतं, असंसुद्धा रवींद्र वायकर म्हणाले. रवींद्र वायकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी थोडक्यात आपली भूमिका मांडली.
रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?
“माझ्यावर जे आरोप होत आहेत ते अत्यंत खोटे आहेत. हे आरोप त्यावेळेलाही होत होते. पण आता मी विरोधात उभा आहे. मला वाचवायला पाहिजे होतं तर त्यावेळेला वाचवलं गेलं नाही. कुटुंब मागे राहिलं नाही ते तिथे बोललो होतो. आता मी विरोधक म्हणून उभा आहे. आमची सत्ता येईलच. त्यातून काम करण्यासाठी मी उभा आहे”, असं रवींद्र वायकर म्हणाले.