Thackeray-Ambedkar : ठाकरे गट-वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तब? उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये उद्या बैठक, राज्यात नवीन राजकीय समीकरणांची नांदी..
Thackeray-Ambedkar : राज्यात लवकरच नवीन राजकीय समीकरण आकाराला येऊ शकते..
मुंबई : ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर (Alliance) सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. वंचितच्या बाजूने अगोदरच युतीसाठी होकार भरण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून युतीबाबत उद्या भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांच्यात उद्या बैठक होत आहे. त्यानंतर युतीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात लवकरच नवीन राजकीय समीकरण आकाराला येणार आहे. आगामी निवडणुकीत त्याचा कोणाला कितपत फायदा होईल, हे स्पष्ट होईल.
उद्याच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येत आहेत. ठाकरे गट-वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असेल. उद्या दुपारी 12 वाजता, महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आले आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या उद्धाटन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर एकत्र आल्याने युतीची चर्चा रंगली होती.
यावेळी दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले होते. त्यानंतर सुभाष देसाई आणि प्रकाश आंबडेकर यांच्यात चर्चेच्या दोन बैठका झाल्या होत्या.
वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत युती करण्यासाठी होकार भरला. त्यानंतर आता उद्या युतीसाठी दोघांमध्ये पहिली अधिकृत बैठक होत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे गटाच्या युतीचा फायदा पालिका निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाशी वंचित बहुजन आघाडी हात मिळवणी करत आहे. पण तो महाविकास आघाडीचा चौथा घटक पक्ष असेल का याबाबतची भूमिका उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.