Uday Samant : हल्ला झाला त्याच ठिकाणी घेणार सभा, दम असेल तर धक्का लावा..! सामंतचा शिवसैनिकांना इशारा
दरम्यानच्या काळात आपल्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. आपण त्यावेळी उत्तर दिले नसले तरी सर्वकाही आपल्या डोक्यात आहे. त्यामुळे एप्रिल 2024 ला सर्वांनाच उत्तरे देणार आहे. जर त्यावेळी मी उत्तर दिले नाहीतर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मधल्या काळात ज्याप्रमाणे टीका झाली त्या सर्वाचा बदला घेणार असल्याचेच सामंत यांनी आजच्या दहीहंडी कार्यक्रमात सांगितले आहे.
रत्नागिरी : पुण्यातील एका कार्यक्रमासाठी (Uday Samant) मंत्री उदय सामंत हे मार्गस्थ होत असताना त्यांच्या गाडीवर (Shiv Sena) शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. आता या घटनेला 15 दिवसांचा कालावधी लोटला असली तरी त्याची सल मात्र, सामंताच्या मनात कायम घर करुन राहिलेली आहे. त्यामुळेच आज (Dahihandi) दहीहंडीच्या दिवशी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला. येत्या 15 दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी एकटा जाऊन सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर ज्यांच्यामध्ये दम आहे त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे सामंत यांनी व्यक्त केलेला निर्धार पूर्ण केला जाणार का हे पहावे लागणार आहे.
नेमके काय म्हणाले आहेत सामंत?
रत्नागिरी येथील दहीहंडी कार्यक्रमात उदय सामंत यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयोजित कार्यक्रमासाठी उदय सामंत देखील आले होते. दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करीत काचा फोडल्या होत्या. मात्र, हे सर्व आपल्या मनात आहे. त्यामुळे आगामी 15 दिवसांमध्ये आपण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जाऊन सभा घेणार आहे. शिवाय त्यावेळी मी एकटा असेल. कुणामध्ये दम असेल तर त्यांनी आपल्या केसाला धक्का लावून दाखवावे असेही आवाहन त्यांनी दिले आहे.
सर्वकाही डोक्यात, 2024 ला उत्तर
दरम्यानच्या काळात आपल्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. आपण त्यावेळी उत्तर दिले नसले तरी सर्वकाही आपल्या डोक्यात आहे. त्यामुळे एप्रिल 2024 ला सर्वांनाच उत्तरे देणार आहे. जर त्यावेळी मी उत्तर दिले नाहीतर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मधल्या काळात ज्याप्रमाणे टीका झाली त्या सर्वाचा बदला घेणार असल्याचेच सामंत यांनी आजच्या दहीहंडी कार्यक्रमात सांगितले आहे. शिवाय 2024 च्या निवडणुकीनंतर उत्तर देणार असे म्हणत त्यांनी विनायक राऊत यांनाच इशारा दिला आहे.
15 दिवसांपूर्वी पुण्यात हल्ला
उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. 3 ऑगस्ट रोजीच्या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वहानाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.