पत्रकार परिषदेतच केंद्रीय मंत्र्यांच्या नाकातून सुरु झाला रक्तस्त्राव, काय घडले…
केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासंबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेत असताना अचानक त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तातडीने जयनगर अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप – जेडीएस नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार होते. पत्रकार परिषद सुरु असतानाच कुमारस्वामी यांच्या नाकातून अचानक रक्त रक्तस्त्राव सुरु झाला. त्यांना तातडीने जयनगर अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार विरोधात भाजप आणि जेडीएस नेते एकवटले आहेत. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यासह कर्नाटकातील भ्रष्टाचारामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी हे नेते एकत्र आले होते. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते बीवाय विजयेंद्र यांनी दिली. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. 7 दिवसांची ही यात्रा आहे. समारोपाची सभा 10 ऑगस्ट होणार आहे. या सभेला भाजपचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
याचदरम्यान केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरु झाला. कुमारस्वामी यांनी रुमालाने आपले नाक झाकण्याचा प्रयत्न केला. पण, रक्ताची धार प्रचंड होती. त्यांचा शर्टही रक्ताने माखला होता. त्यांना तातडीने जयनगर अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. शरीरातील अतिउष्णतेमुळे त्यांच्या नाकातून रक्त आले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, कर्नाटकचे एलओपी आर अशोक यांनी ‘आम्ही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात पदयात्रा काढणार आहोत. अनुसूचित जमाती समाजाच्या कल्याणाचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला आहे. कर्नाटकातील हा मोठा घोटाळा असून त्यात सीएम सिद्धरामय्या यांचा सहभाग आहे. सरकारने आमचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असा इशारा दिला.