Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : आमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : अपक्ष आमदार काही करणार नाहीत. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे संजय पवार (sanjay pawar) यांचा धक्कादायक पराभव झाला. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं सांगतानाच दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला वारंवार फोन जात होता. कुणाची मते बाद करायची आणि कुणाची नाही याचे निर्देश दिले जात होते, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप केले. अपक्ष आमदार काही करणार नाहीत. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असं संजय राऊत म्हणाले.
तर भाजपही आम्हाला मतदान करेल
अपक्ष आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला हे आम्हाला सगळं माहीत आहे. म्हणून बोललो. विषय संपला. एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असं होत नाही. महाप्रलय आला असं होत नाही. अनेक राज्यात असा निकाल लागला आहे. राजस्थानात काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला. महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले लोकं काय करत होते सर्व माहीत आहे. केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा सुरू होती हे सर्व माहीत आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. फक्त ईडी आमच्याकडे 48 तासासाठी दिली तर भाजपही आम्हाला मतदान करेल, असं ते म्हणाले.
पाटील चोरून सामना वाचतात
आम्ही दैनिक सामना वाचत नाही या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. सर्वात आधी चंद्रकांत पाटील सामना वाचतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील पूर्वी चोरून सामना वाचायचे. आताही वाचतात, असा चिमटा त्यांनी काढला.