EXCLUSIVE : तर मला ‘सामना’चं काम सोडावं लागेल : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुममध्ये येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. संजय राऊत यांच्या हस्ते टीव्ही 9 च्या बाप्पाची आरती झाली. या आरतीनंतर संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केलं.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुममध्ये येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. संजय राऊत यांच्या हस्ते टीव्ही 9 च्या बाप्पाची आरती झाली. या आरतीनंतर संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केलं. मला सध्या कपडे लाँड्रीत टाकायलाही भीती वाटते, कारण कधी मनी लाँड्रिंगची केस दाखल होईल सांगता येत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. गडकरींनी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं, आमदारांना मंत्रिपद नाही म्हणून नाराज, मंत्र्यांना खातं नाही म्हणून नाराज, तर चांगलं खातं मिळालेल्यांना मुख्यमंत्रिपद नाही त्यामुळे नाराज आहेत. याशिवाय आपलं पद कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्रीही टेन्शनमध्ये असतात असं गडकरी म्हणाले होते.
तर मला सामनाचं काम सोडावं लागेल : संजय राऊत
यावरुन तुम्हाला कोणतं पद हवं, तुमची काय अपेक्षा आहे, केंद्रात मंत्री वगैरे व्हायचं आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “माझी काहीही अपेक्षा नाही. मला खासदार व्हायचंय किंवा केंद्रात मंत्री व्हायचंय अशी कोणतीच अपेक्षा नाही. मी राज्यसभेचा खासदारही इच्छा नसताना झालो. आता तिथे रमलो. जर केंद्रामध्ये मी मंत्री झालो तर मला जे माझं आवडीचं काम आहे ‘सामना’चं ते मला सोडावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
माझ्या खांद्यावर राहुल गांधींचा हात
यावेळी संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्यासोबतच्या मैत्रीबाबत विचारण्यात आलं. राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर हात टाकल्याचं चित्र देशाने पाहिलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, सध्या आमचे एकमेकांच्या खांद्यावर हात आहेत. राहुल गांधींनी खांद्यावर हात टाकल्यामुळेच नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा मवाळ झाली का असा प्रश्न विचारला तेव्हा, संजय राऊत मोठ्याने हसले.
“राहुल गांधी मला अधून- मधून फोन करत असतात. माझी परखड मतं मांडत असतो. मला काही इंटरेस्ट नसतो. कोणी मतं मागितली तर पक्षपात न करता मी मतं देत असतो. आमच्या खांद्यावर हात टाकल्याने कुणाला पोटात दुखायचं कारण नाही. निर्बंध सैल झाल्यावर मुलाखतींचा सिलसिला सुरु होईल. येत्या काळात सामना दैनिकात राहुल गांधी यांचीही मुलाखत वाचायला मिळू शकते”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.