मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
निवडणुकीत म्हणाले कर्जमाफी देऊ. काल अजित पवार म्हणाले पैसे भरा. आता कर्जमाफी होणार नाही. तुम्ही ऐन मोक्यावर म्हणणार पैसे भरा. वारे वा. जनतेला विचारायचं की तुम्ही इतक्या भाबडेपणाने मत कसं देता असाही सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गुढी पाडव्याच्या सभेत सध्याच्या राजकारणावर जळजळीत भाष्य केले आहे. राजकारणी लोक तुम्हाला जातीपातीत गुंतवून आपली पोळी भाजत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. औरंगजेबाच्या कबरीवरुन आपल्याला भडकवलं जात आहे. या औरंगजेबाचा इतिहास माहीती नसलेले विधानसभेतही औरंगजेबावर बोलत आहेत. परंतू त्यांना औरंगजेब म्हणजे कोण होता हे माहीती आहे का ? इतिहास व्हॉट्सअपवर नाही तर पुस्तकं उघडून वाचावा लागतो असेही राज ठाकरे म्हणाले.
आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात
राजकारण्यांनी असे माथी भडकविणारे विषय काढले की आपण आपले विषय बाजूला ठेवतो, भलत्याच गोष्टी काढतो. संतोष देशमुखला घाणेरड्याप्रकारे मारलं. किती घाणेरड्या प्रकारे मारावं. तुमच्या अंगात नसानसात एवढी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा. तिथे जा. हे झालं कशातून. विंड मिल,आणि राखेतून, या प्रकल्पातून निर्माण होणारी राख आहे. मी ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. विषय होता पैशाचा. देशमुख यानी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसता कोणी असता तर तेच केलं असतं. विषय होता, पैशाचा. खंडणीचा. आपण लेबल काय लावलं. वंजाऱ्याने मराठ्याला मारलं? त्यात वंजाऱ्याचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय आपण ?. पण तुम्हाला गुंतवलंय जातं. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवत असतात असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
जात जातीला कधीच सांभाळत नाही
तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका. दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. लक्ष देऊ नका. रोजगाराकडे लक्ष देऊ नका. आपण जातीपातीत अडकत गेलो. कोणी जातीचं भलं केलं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्षा जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं ? काय केलं या आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी. माझ्या मराठा समाजाला समजा आरक्षण मागावं लागत असेल तर एवढे आमदार, खासदार मुख्यमंत्री मंत्री का निवडून दिले.? त्यांनी काय केलं? जात जातीला कधीच सांभाळत नाही. फक्त मते घेण्यासाठी तुमचा वापर करतात असे कोरडे राज ठाकरे यांनी ओढले.