Vasant More | संजय राऊत यांच्यासोबत वसंत मोरेंची अर्धातास चर्चा, भेटीनंतर तात्या काय म्हणाले?
Vasant More | "पुण्यात वॉशिंग मशीन नको, मी सुद्धा याच मताचा आहे. पुण्यातील नागरिकांच्या हितासाठी मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पुण्यात हुकूमशाही सारख वातावरण आहे, त्या विरोधात मी काम करतोय"
मुंबई : मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे सध्या अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. वसंत मोरे काल शरद पवार यांना भेटले होते. आज त्यांनी सामना कार्यालयात येऊन संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास चर्चा केली. संजय राऊत यांना भेटल्यानंतर वसंत मोरे मीडियाशी बोलले. “मी माझी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडली आहे. मला वाटत, मला संधी मिळेल. पूणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. मविआच्या नेत्यांना भेटत आहे. पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायच आहे” असं वसंत मोरे म्हणाले. महाविकास आघाडीतील एक पक्षात प्रवेश करणार का? असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला.
“अजून भेटीगाठी सुरु आहेत. मागच्या दाराने मी भेटत नाहीय. थेट जाऊन भेटतोय. सगळ्या चर्चा सकारात्मक होत आहेत. सर्वचजण विचार करतील. पुण्यात वॉशिंग मशीन नको, मी सुद्धा याच मताचा आहे. शरद पवारांना भेटलो. काँग्रेसकडे जागा आहे, मोहन जोशींनी भेटलो. रवींद्र धनगेकरांसोबत फोनवरुन बोलण झालय. पुण्याला गेल्यावर भाऊला भेटेन” असं वसंत मोरे म्हणाले.
मविआकडून प्रतिसाद मिळाला नाही तर?
“माझा प्रस्ताव मी रवींद्र भाऊसमोर मांडेन. ते आमचे गट नेते होते. मी ज्या पद्धतीने विचार करतो, तो प्रस्ताव मी मांडला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे” असं वसंत मोरे म्हणाले. महाविकास आघाडीकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही, तरी लोकसभा निवडणूक लढवायची का? त्यावर ते म्हणाले की, ‘ज्या विषयासाठी मी पक्ष सोडला, त्या पासून लांब जाणार नाही’
‘पुण्यात हुकूमशाही सारख वातावरण’
मनसेची भाजपासोबत युती होईल अशी चर्चा आहे, त्या बद्दल वसंत मोरे म्हणाले की, “मनसे या विषयावर मी बोलू इच्छित नाही. मी ज्या कारणासाठी पक्ष सोडला, त्या मुद्यावर आता मी काम करत आहे. पुण्यातील नागरिकांच्या हितासाठी मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पुण्यात हुकूमशाही सारख वातावरण आहे, त्या विरोधात मी काम करतोय”