Eknath Shinde : बाळासाहेबांचा निष्ठावान सेवक चंपा सिंह थापा अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत, म्हणाला….
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्या गाडीतील एक व्यक्तीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं, तो म्हणजे चंपा सिंह थापा. बाळासाहेबांचा निष्ठावान सेवक अशी चंपा सिंह थापाची ओळख होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत चारवेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री शिंदेंनी शक्ती प्रदर्शन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या गाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले, त्यामध्ये चंपा सिंह थापा होता. चंपा सिंह थापा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान सेवक होता. दोन वर्षांपूर्वी चंपा सिंह थापाने शिंदे गटात प्रवेश केला.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत TV9 मराठीने संवाद साधला. “उत्साह माझ्यापेक्षा मतदारांमध्ये जास्त आहे. सकाळपासून सगळीकडे मतदरासंघात उत्साह पहायला मिळतोय. मी नशिबवान आहे, मतदारांनी एवढं प्रेम माझ्यावर केलं. चारवेळा मला आमदार केलं. माझ्या संघर्षाच्या काळात पण माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. मागच्या दोन वर्षात महायुती सरकारने ऐतिहासिक कामं केली आहेत. याची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. घेतलेल्या निर्णयांची अमलबजावणी केली” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात मुद्दे काय?
“शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. लाडकी बहिण योजना सुरु केली. ज्येष्ठांसाठी योजना आणल्या. जे बोललो, ते करुन दाखवलं. कोणीही कितीही वल्गना केल्याच तरी ही मॅच आम्हीच जिंकणार” असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात अनेक जुन्या चाळी आहेत. पूनर्विकासाचा मुद्दा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्ही क्लस्टरच्या योजनेवर काम करतोय. पुढच्या काही काळात लोकांना चांगले फ्लॅट मिळतील”
चंपा सिंह थापा काय म्हणाला?
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक राहिलेल्या चंपा सिंह थापाशी संवाद साधला. तो म्हणाला की, “मला चिक्कार आनंद होत आहे. पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री नेहमी माझ्या मदतीला धावून येतात”