पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांना विषारी इंजेक्शन, मनसेचा आरोप
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप होतो आहे.
मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी (Tree Cutting In Worli) विधानसभा मतदारसंघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे. मनसेकडून हा आरोप केला जात आहे. झाडांना विषारी इंजेक्शन देऊन झाडांची कत्तल केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
एका खाजगी जाहिरात होर्डिंगसाठी माडाच्या झाडांचा (Tree Cutting In Worli) बळी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी या प्रकरणी स्थानिक महापालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
इतकंच नाही, तर या प्रकरणी एका व्यक्तीला दीड ते दोन महिन्यांपूर्वी स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. ही व्यक्ती झाडाच्या खोडांमध्ये विषारी इंजेक्शन मारत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं, त्यानंतर त्यांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र, पोलिसांनी त्या व्यक्तीला सोडून दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
वरळी समुद्र किनाऱ्याजवळ ब्लू सी हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला एक सरकारी वसाहत आणि मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे. या परिसरात मुंबई महापालिकेचं एक होर्डिंग आहे. हे होर्डिंग सध्या एका खासगी ठेकेदाराला देण्यात आलं आहे. या नव्या होर्डिंगचं काम सध्या सुरु आहे. या होर्डिंगच्या दर्शनी भागासाठी आसपासच्या परिसरातील झाडांची विषारी इंजेक्शन देऊन कत्तल केली जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी स्थानिक महापालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, महापालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप आहे.
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं म्हणणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काय पाऊल उचलतात याकडे सध्या (Tree Cutting In Worli) सर्वांचं लक्ष लागलं आहे.