पवारांना दगा दिला ते हुकमी एक्के पडणार?, लोकसभेच्या आकडेवारीने दिली वॉर्निंग; TV9 मराठीचा धक्कादायक पोल
लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांच्या विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाल्याचं आढळून आलं आहे. हे कमी मतदान त्या आमदारांसाठी धोक्याची घंटाच असल्याचं मानलं जात आहे. उद्या असाच निकाल लागला तर या आमदारांना घरी बसावं लागेल असे संकेतही मिळताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीने अनेकांना वॉर्निंग दिली आहे. या निवडणुकीत अनेकांचं पानिपत होणार असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. टीव्ही9 मराठीने या आकडेवारीचा अभ्यास करून पोल तयार केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या आमदारांनी शरद पवारांना दगा दिला, त्यांचं या निवडणुकीत पानिपत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे. जे मला सोडून जातात, ते विधानसभेत पुन्हा दिसत नाहीत, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांचं हे म्हणणं या पोलमधून खरं होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्याची जी आकडेवारी आली. त्याचा टीव्ही9 मराठीने पोल तयार केला आहे. या पोलनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना घरी बसावं लागणार असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समजले जाणारे आणि आता अजितदादा गटात असलेले छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे सुद्धा घरी बसतील असं चित्र आहे. हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघात मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.
हा पोल किंवा आकडेवारी केवळ लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आकड्यांवर आधारीत आहे. हे चित्र कायमच असेल असं नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकांना अजून चार महिने बाकी आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात, उमेदवार वेगळे असतात, मतदारसंघाचा अवाका वेगवेगळा असतो आणि स्थानिकांची मानसिकता दोन्ही निवडणुकीत वेगवेगळी असते, त्यामुळे हे निकाल आहे तसेच राहू शकतात, बदलू शकतात किंवा त्यात काही फरक होऊ शकतो.
अजितदादा गटाच्या आमदारांची पिछाडी
अजितदादा गटाचे आमदार, मंत्री दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 11 हजार 368 मतांनी पिछाडीवर आहेत.
अजितदादा गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघात 13 हजार 205 मतांनी पिछाडीवर आहेत.
अजितदादा गटाचे आमदार संजय शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून 52 हजार 515 मतांनी पिछाडीवर आहेत.
नवाब मलिक हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून 29 हजार 83 मतांनी पिछाडीवर आहेत.
माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 28 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 55 हजार 951 मतांनी मागे
किरण लहामटे हे अकोलो विधानसभा मतदारसंघातून 54 हजार 379 मतांनी पिछाडीवर आहेत.
शिंदे गटाच्या आमदारांची पिछाडी
लोकसभेच्या आकडेवारीनुसार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात महायुती 27 हजार 759 मतांनी पिछाडीवर आहे.
तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात महायुती 81 हजार 177 मतांनी पिछाडीवर आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत हे 10 हजार 37 मतांनी मागे आहेत.
शिंदे गटाच्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघात 46 हजार 66 मतांनी पिछाडीवर आहे. विशेष म्हणजे यामिनी जाधव या दक्षिण मुंबईतून निवडणुकीला उभ्या होत्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात त्यांना 46 हजार 66 मते कमी मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
शिंदे गटाचे संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 21 हजार 20 मतांनी पिछाडीवर आहेत.
शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघातून 23 हजार 659 मतांनी पिछाडीवर आहेत.