दिनेश दुखंडे, अक्षय मंकंनी आणि कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ही भेट आज ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग आल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीला मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत विनायक राऊत हे देखील उपस्थित असल्याचं कळतंय. सध्या सुरु असलेल्या बैठकीत महायुतीबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती राजकीय पटलावर एकत्र येते का? नवं राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पाहायला मिळतं का? या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष म्हत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वीच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार नसल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर आलं.
रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोमवारी सकाळपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर आले होते. त्यावेळी आंबेडकर आणि ठाकरे एकत्र येण्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आता प्रत्यक्षात तशा हालचालींनाही वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील राजकीय घडामोडींनाही आता वेग आलाय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे देखील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये दिसून आले. ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीनंतर आता नेमकी काय भूमिका उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.