Uddhav Thackeray : ‘शिवसैनिकांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते लाल करु नका!’ ठाकरेंचं आवाहन, मुंबईत तगडा पोलीस बंदोबस्त
Uddhav Thackeray Latest News : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संबोधित करताना महत्त्वाचं आवाहन केलंय.
मुंबई : मुख्यपंत्रीपदाचा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलंय. आता नव्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. तर दुसरीकडे मुंबईत तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. बंडखोर शिवसेना (Rebel Shivsena MLA) आमदारांसह अपक्ष आमदारही आज मुंबईत दाखल होणार आहे. गुवाहाटीतून बुधवारी रात्री गोव्यात पोहोचलेल्या बंडखोर आमदारांना मुंबईत तगड्या पोलीस बंदोबस्तात (Mumbai Police Security) आणलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय. यावर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संबोधित करताना महत्त्वाचं आवाहन केलंय. सुप्रीम कोर्टानं बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची ठाकरेंची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याची भूमिका स्पष्ट केली होती.
20 डिसीपी आणि त्यांच्या दर्जाचे पोलीस अधिकारी, 45 एसीपी, 225 पोलीस इन्स्पेक्टर, 725 असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस सबह इन्स्पेक्टर, 1250 महिला पोलीस हवालदार, 25000 पोलीस हवालदार आणि एसआरपीएफच्या 10 तुकड्या शिवाय 750 जणांची अतिरीक्त फोर्स मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती डीसीपी संजय लाटकर यांनी दिली होती. यावेळी मुंबईतील वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली जाईल. दरम्यान, मुंबईत आधीच कलम 144 लागू करण्यात आलेलं आहे. संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूममीवर विधान भवन आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांना फिरकू न देण्याची खबरदारीही घेतली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलंय, की,…
केंद्राच्या सूचनेवरुन मुंबईथ बंदोबस्त वाढवलाय. शिवसैनिकांना घरातच राहा, अशा नोटीस पाठवल्या गेल्यात. केंद्रीय राखीव दल मुंबईत दाखल होतोय. लष्करही येईल. चीन सीमेवरील सैन्यसुद्ध काढून मुंबईत आणलं जाईल. पण हे कुणासाठी? कशासाठी? ज्या शिवसैनिकंनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला त्यांच्या रक्ताचे तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? एवढी माणुसकी विसरलात? एवढं नातं तोडलंत?
बंडखोरांच्या अधेमधे येऊ नका असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. मुंबईत केंद्र सरकारच्या सूचनेवरुन केंद्रीय राखीव दल आलेलंय. निमलष्करी दल, लष्करही आणतील. आजूबाजूच्या देशातूनही सैन्य आणणार असतील. तर आणू द्या. ती बंडखोरांची नातेमंडळी आहेत. शिवसैनिकांनो, तुम्ही बंडखोर आमदारांच्या अधेमधे येऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. लोकशाही जल्लोष करण्यासाठी कुटुंब एकत्रित आले पाहिजे म्हणून ते आलेत, असंही त्यांनी म्हटलं.