उद्धव ठाकरेंच्या ‘डोक्याला शॉट’, ‘या’ 8 जागांवर तिकीट कुणाला?
मुंबई : शिवसेना-भाजप युती झाली खरी, मात्र शिवसेनेत आता दुफळी माजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांची नाराजी उघडपणे समोर आल्यानंतर, आता आणखी काही लोकभा मतदारसंघात आणि काही नेत्यांमध्ये नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोक्याला ताप होणार असल्याचे स्पष्ट आहे. ‘या’ 8 […]
मुंबई : शिवसेना-भाजप युती झाली खरी, मात्र शिवसेनेत आता दुफळी माजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांची नाराजी उघडपणे समोर आल्यानंतर, आता आणखी काही लोकभा मतदारसंघात आणि काही नेत्यांमध्ये नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोक्याला ताप होणार असल्याचे स्पष्ट आहे.
‘या’ 8 जागांवरुन उद्धव ठाकरेंच्या डोक्याला ताप
नाशिक लोकसभा मतदारसंघ :
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडेस विद्यामान खासदार आहेत. मात्र, खासदार हेमंत गोडसेंना शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी विरोध केला आहे. गोडसेंपेक्षा या जागेसाठी आपण अधिक लायक असल्याचे त्यांनी ‘मातोश्री’वर कळवले आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. खासदार खैरे यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. मात्र आता शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी खैरेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. किंबहुना, खैरे आणि दानवे यांच्यात जिल्ह्यातही काही पटत नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करतात. मात्र अनंत गीतेंना गेल्यावेळीप्रमाणे राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे हेच आव्हान देणार असल्याने, शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. कारण यावेळी तटकरेंनी रायगड जिल्हा पिंजून काढला आहे, अनेक दौरे करत आहेत. त्यामुळे गीतेंना मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
यवतमाळचं नेतृत्त्व शिवसेनेच्या भावना गवळी या करतात. मात्र, याच जागेसाठी शिवसेनेचे संजय राठोड हे इच्छुक आहेत. शिवाय, भावना गवळींच्या विरोधात नाराजी स्थानिक पातळीवर नाराजीही व्यक्त केली जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहेत. मात्र, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून लढण्याची चर्चा असल्याने, तसेच दुसरीकडे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांचीही बारणेंविरोधात नाराजी असल्याने बारणेंचा विजय डळमळीत झाला आहे. स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनही बारणेंविरोधात उघड नाराजी आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेचे सदाशीव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. मात्र, ते लोकसभा मतदारसंघात फिरकलेच नाहीत, असा आरोप थेट शिवसैनिकांचाच आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ
साताऱ्यातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी भाजपला मदत करावी आणि त्याबदल्यात शिवसेनेने तानाजी सावंत यांना माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात लढवावं, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. तसे स्थानिक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनाही कळवले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ
अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ हे खासदार आहे. मात्र, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे.