26 वर्षाच्या तरुणाने कपाशीला भाव मिळाला नाही म्हणून स्वत:ला संपवलं, उद्धव ठाकरे यांनी खान्देशातील वास्तव सांगितलं
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आज खान्देशातील भयानक वास्तव सांगितलं. कपाशीला (कापसाला) योग्य भाव मिळत नाही म्हणून खान्देशात दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपवलं. यामध्ये एका 62 वर्षीय शेतकरी तर दुसरा शेतकरी हा अवघ्या 26 वर्षांचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
जळगाव : कपाशी म्हणजे कापसाला आपण शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मानतो. खान्देशातील अनेक भागांमध्ये कापसाची शेती केली जाते. देशाला कापूस पुरवण्यात खान्देशाचं मोठं योगदान आहे. पण याच खान्देशातील शेतकऱ्यावर कपाशीच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याच्या, मन हेलावणाऱ्या घटना घडत असल्याचं वास्तव समोर येताना दिसत आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमधील अनेक गावांमधील शेतकरी आज कपाशीला योग्य भाव मिळत नाही म्हणून चिंतातूर आहेत.
मोठ्या शेतकरींच्या संख्येपेक्षा एक ते पाच बिगा जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही हजारांमध्ये आहे. जमीन कमी असल्याने जेमतेम जो शेतमाल आलाय त्याला योग्य भाव मिळवण्यासाठी किती ससेहोलपट करावी लागतेय याची सरकारला जाणीव आहे की नाही? असा मार्मिक प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे हाच मुद्दा आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या पाचोऱ्यातील सभेत खेचला आहे.
उद्धव ठाकरे यांची आज पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. खान्देशात सध्या घराघरात कापूस पडून आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला पण शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला नाही, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आजच्या भाषणावेळी बोलले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भयानक वास्तव सांगितलं. कपाशीला (कापसाला) योग्य भाव मिळत नाही म्हणून खान्देशात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये एका 62 वर्षीय शेतकरी तर दुसरा शेतकरी हा अवघ्या 26 वर्षांचा आहे, असं सांगितलं.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“जळगावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका 62 वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुसरा 26 वर्षाचा मुलगा राहुल राजेंद्र पाटील याने कपाशीला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही म्हणून नैराश्यात आत्महत्या केली. का? कारण त्याने वडिलांकडून पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली. पीक गेलं. पण पीक गेल्यानंतर वडिलांना तोंड काय दाखवू, वडिलांना पैसे कुठून देऊ? डोक्यावर कर्जाचा बोझा आहे. २६ वर्षाच्या पोराने गळफास लावून घेतला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा. एक शेतकरी मला भेटला, कवी आहे. त्यांना मंचावर आणू शकतो. पण कारवाई केली जाईल. शेतकऱ्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला अटक करतील. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आता बांधावरी, तुमचं सगळं चांगलं असेल ओकेमधी, पण माझ्या कापसाला भाव किती? हे विचारणारा शेतकरी. या शेतकऱ्याला मी मुद्दाम इथे आणलं नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘यांनी बहिणाबाईंनाही तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं’
“तशीच एक आपली बहिणाबाई, खान्देशाची बहिणाबाईचं नाव ऐकलंय का? आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. बहिणाबाई किती सोप्या भाषेत बोलून गेली. मोठमोठे जे पंडीत समजवू शकत नाही ते ती अशिक्षित बाई सोप्या भाषेत बोलून गेली. ती सोप्या भाषेत म्हणाली, जो इमानाले विसरला त्याला नेक म्हणू नये, जलमं दात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये. हे जन्मदात्याला भोवणारे सगळे गद्दार. मगाशी घोषणा दिली की, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. नाही रे बाबा, मी अशा गद्दारांचा बाप नाही. अशी घाणेरडी औलाद आपली असूच शकत नाही. पाठिवरती सोडाच पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असू शकत नाही. भाषम ऐकून आपण मोठे झालो, काही लोक बाप बदलतात तर काही बाप चोरतात”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.