धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवार बोलले, उद्धव ठाकरे भाष्य करणार?
थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो (Uddhav Thackeray Dhananjay Munde )
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुंडेंची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठराखण होताना दिसत आहे, तर दुसरीकडे भाजपातील एका गटाने धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल दुपारी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप याविषयी भाष्य केलेले नाही. (Uddhav Thackeray no comment on Dhananjay Munde alleged Rape Case)
धनंजय मुंडे यांच्याकडून पक्ष तूर्तास कुठलाही राजीनामा घेणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे. मागच्या काळात धनंजय मुंडे त्रासात होते. पोलिसांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करावी, जो दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करावी, धनंजय मुंडे दोषी आढळले, तर पक्ष कारवाई करेल, मात्र कोणी कुठल्याही निष्कर्षावर येऊ नये, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुंडे आणि ठाकरे घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई करताना मुख्यमंत्र्यांना हे संबंध आडवे येतील का? या बाबत अनके तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवाय धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. उद्या मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची वेळ आली तर पवार त्याला संमती देतील का? याबाबत काहीही सांगता येत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
मुंडेंवर गंभीर आरोप, पक्ष म्हणून दखल : शरद पवार
धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री अद्याप निर्णय का घेत नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. “धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले.
धनंजय मुंडे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे, असंही शरद पवारांना विचारण्यात आलं. “मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ” असंही शरद पवार रोखठोकपणे म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
पंकजा मुंडे कुठे आहेत?; मौनामागचं कारण काय?
बलात्काराच्या आरोपांनंतरही धनंजय मुंडेंवरील कारवाई राष्ट्रवादीने का टाळली?
(Uddhav Thackeray no comment on Dhananjay Munde alleged Rape Case)