मुंबई : सध्या महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरू आहे. एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. त्याला आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दुजोरा दिली आहे. “हे सर्व भाजपनेच केलंय, या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर थेट हल्ला केलाय.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपसोबत हात मिळवणी करावी अशी मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी इच्छा आहे. तसं ते उघडपणे बोलतही आहेत. शिंदे गटाच्या या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केलं गेलेल्यांना त्यांनी यावेळी सुनावलं आहे.
“एकनाथ शिंदे यांचं बंड केलं त्याला भाजप जबाबदार आहे. त्यांनीच शिंदेंना फुस लावली. हे सगळं भाजपनेच केलंय, या आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट हल्ला केलाय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांशी, पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्मयंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर निशाणा साधताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असं देखील ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंच्या बंडावर नाराजी व्यक्त केली. “एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे.शिंदेंसाठी मी काय कमी केलं?”, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा”, असं आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.