मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरलं आहे. तर या वादात ठाकरे गटाने उडी घेत काँग्रेसची पाठराखण केली आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. साप हा शेतीचा राखणदार आहे. तसेच भगवान शंकराच्या गळ्यातही सापच आहे. भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंकराचा अवतार मानतात. मग सापाचा एवढा तिटकारा का? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुंगी वाजवतात आणि अंधभक्त त्यावर डोलतात, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.
शंकराने विष पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णू आणि शंकराचे आवतार वाटतात. मग साप गळ्यात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याची गरज काय? असा सवाल करतानाच भाजपच्या जिभांतील विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाले आहे. न्यायालये, संसद आणि सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने मोदी रोज पुंगी वाजवतात. त्यावर अंधभक्त डोलतात. जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जात असल्याची घणाघाती हल्ला ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
भाजपच्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपने त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आम्हीही 30 वर्ष सापाला दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावर फुत्कारत आहे, अशी जहरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. जेव्हा आपला जीव धोक्यात असतो तेव्हाच साप चावतो. पण दुष्य माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करत असोत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहिलेच पाहिजे. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असंच खरगे यांना म्हणायचे आहे, असा दावा अग्रलेखातून करणअयात आला आहे.
या अग्रलेखातून सापाचं महत्त्वही सांगण्यात आलं आहे. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतीचा राखणदार आहे. नागराज आणि सापराज हे हिंदू धर्मात श्रद्धेच्या स्थानी आहेत. त्यांची पूजा केली जाते. त्याच्यात विष असूनही पूजा केली जाते. त्यामुळे सापाची पदवी एखाद्याला दिल्यास त्याने उसळायची गरज काय? असा संतप्त सवाल करण्यात आला आहे. साप म्हणजे सोवळ्यातला ब्राह्मण आहे असं वर्णन विनोबा भावेंनी केले होते, याकडेही अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आलं आहे.
साप उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. त्याच्या शेपटीवर पाय पडल्याशिवाय तो फणा काढत नाही. पण सापांपेक्षाही माणसांच्या जिव्हांतले विष भयंकर आहे आणि न उतरणारे आहे, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विषाचा महायज्ञ मांडला आहे. भाजपचे लोक देशद्रोही फुत्कार सोडत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.