मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. शिवसेना (shivsena) कुणाची? धनुष्यबाण हे चिन्हं कुणाचं? अपात्र आमदारांचं काय होणार? आणि शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार? हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. तसेच कोर्टाचा निकाल हा केवळ निकाल राहणार नसून देशासाठी लँडमार्क ठरणार आहे. त्यामुळे या निकालाकडे केवळ महाराष्ट्राचंच (maharashtra) नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही उद्या होणाऱ्या निकालावर भाष्य केलं आहे. उद्या कोर्टात जे व्हायचं ते होईल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. माझ्यासोबत जनतेच्या भावना जोडल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शिवसैनिक आज शपथपत्रं घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत. या दललीतून बाहेर पडण्याची लोक वाट पाहत आहेत. या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूका घ्या म्हटल्या जात आहेत. मात्र निवडणूक घेण्याची यांच्यात हिंमत नाही, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी निलम गोऱ्हे यांच्या कामाचं कौतुक केलं. निलमताई या शिवसेनेत नव्हत्या. त्या आमच्या विचाराच्या नव्हत्या. त्या चळवळ्या कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. एके दिवशी त्यांचा निरोप आला. भेटायचं आहे. मी म्हटलं, या आपल्या विचाराच्या नाहीत. आता का भेटत आहेत? पण त्या भेटल्या. चर्चा केली. विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्यांनी भंडावून सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला. मला शिवसेनेत यायचं आहे. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. निलमताईंनी प्रत्येक प्रश्न मार्गी लावला. त्यांनी कोणताच प्रश्न अर्धवट ठेवला नाही. त्या दिवस रात्र राज्यात फिरून लोकांना भेटत असतात. यवतमाळमध्येही संचारबंदी असताना त्या फिरत होत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निलमताई काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांना खडसावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. तो कोण होता म्हणून नाही. आपण जिथे बसलो, ज्या पदावर बसलो त्याला न्याय देताना आपण कुठे आलो आहोत याचं भान महत्त्वाचं. या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. उद्या कोणताही मुख्यमंत्री कसा वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे. तुम्ही काही असेल तर तुमच्या घरी. विधानसभेत वागताना सर्वांनी मर्यादेत वागलं पाहिजे. त्याचं भान तुम्ही राखलं, असं त्यांनी सांगितलं.
आपल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात. आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये. महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये. स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर आपल्या कार्यकर्त्याला दयामाया दाखवू नये. तुमचं सरकार म्हणून आम्ही बोंबलतोय. आमचं सरकार म्हणून तुम्ही बोंबलणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर काम केलं पाहिजे, असं ते म्हणाले.