नरेंद्र मोदी मोठे भाऊ.. उद्धव साहेब पुढे या, शिंदे गटाची कळकळीची विनंती, मुख्यमंत्र्यांचं मन वळणार का?
एकनाथ शिंदे गटाच्या विनंतीला मान देऊन, पक्ष वाचवण्यासाठी का होईना उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का, त्यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात विभागल्या गेलेल्या शिवसेना आणि शिंदेसेनेतील संवाद-विसंवाद आता शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपसोबत (BJP) हात मिळवणी करा, असं एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना वारंवार सांगण्यात येतंय. तर उद्धव ठाकरे यांच्याकडूनही आमदारांनी परत यावं, तुम्ही म्हणाल ती भूमिका मी स्वीकारायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी अजूनही आम्ही शिवसेनेचाच एक भाग असून शिवसेना सोडून जाण्यात आम्हाला काहीही रस नाही, असंच वारंवार सांगितलंय. फक्त उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडून भाजप नेतृत्वाशी हातमिळवणी करावी, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. इतकच नाही तर ही कळकळीची विनंती असून ठाकरेंना हे शेवटचं आवाहन असल्याचंही त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज माध्यमांसमोर ही भूमिका मांडली. आता उद्धव ठाकरे त्यांच्या विनंतीला मान देणार का, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.
‘मोदी मोठे भाऊ पुढे या’
दीपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे गटातर्फे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, ‘नारायण राणे आज तुमची बदनामी करत नाहीयेत. हा खूप मोठा राजकीय संघर्ष आहे. मग बीजेपीनं त्यांना घेतलं, हे चुकीचं नाहीये. बीजेपीनं काय करावं हे सांगणारा मी कुणी नाहीये. परंतु ती बदनामी बोण्यामागे एकाच माणसाचा हात होता. त्याचं जूनं वैर होतं. आज नारायण राणे हा विषय नाही. भाजपा हा विषय आहे. बीजेपीचे प्रमुख आहेत, त्यांच्यामुळे पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यांचे प्रमुख मोदी साहेब तुम्हाला लहान भाऊ मानतात. कुणाशी बोलू नका. थेट त्यांच्याशी बोला. फडणवीस साहेबांशी बोललात तर मला आनंद आहे. तेसुद्धा तुम्हाला खूप मानतात. पण निर्णय आम्हाला द्या…
‘कळकळीची विनंती शेवट गोड करा…’
शिवसेनेकडून वारंवार गद्दार असं म्हणून हिणवण्यात येतंय, याबद्दलही दीपक केसरकर यांनी खंत व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, ‘ आमची का बदनामी करतायत? मानसिक ताण आम्हाला का देतायत? उगाच का सांगतायत लोकांना आम्ही काही आमदारांच्या संपर्कात आहोत म्हणून.. कुणीही नाही. सगळे आपल्या तत्त्वाशी आहेत. उद्या जर त्यांनी तुमच्यापासून दूर जायचं ठरवलं तर त्यांनी दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी बंड केलं होतं, असं लोक आरोप करतील. आजच लोकं आरोप करतायत, लोकं फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतायत म्हणून. एक आमदार पाच दिवसांचं फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल भरू शकत नाही का? असे का बदनाम करता? कळकळीची विनंती करतो शेवट गोड करा… ‘ एकनाथ शिंदे गटाच्या विनंतीला मान देऊन, पक्ष वाचवण्यासाठी का होईना उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का, त्यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.