Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, तेव्हा तंत्रज्ञान प्रगत होतं, आता नाही का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : "नौदल आपलं एवढं पोकळ आहे का? ते समुद्राशीच खेळत असतात. ही जबाबदारी नौदलावर टाकून मोकळे होणार आहात का? किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं का?" असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले आहेत.
मालवणात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीने या मुद्यावरुन राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला यावरुन अनेक प्रश्न विचारले.
“गुन्हा दाखल करणार असाल, तर गुन्हा घडला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? मोदी आले त्यांच्या हस्ते अनावरण झालं. त्यांचा संबंध आला. नौदल आपलं एवढं पोकळ आहे का? ते समुद्राशीच खेळत असतात. ही जबाबदारी नौदलावर टाकून मोकळे होणार आहात का? किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं का? निवडणूका होत्या, कोकण जिंकायचं यासाठी हा घाट घातला” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
‘हे त्याला कळत नव्हतं का?’
“शिल्पकाराला ठराविक वेळ दिली होती. त्याचं वय कमी. मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही. समुद्र किनारी पुतळा करताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे, हे त्याला कळत नव्हतं का? शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तो अजूनही आहे. तेव्हा तंत्रज्ञान प्रगत होतं. आता नाही का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
‘हे पाप उघड झालं’
“हे गुन्हे ज्या पद्धतीने दडपून टाकत आहेत, मतं मिळवण्यासाठी घाई करत होते. हे पाप उघड झालं आहे. बदलापूरची घटना बघा. त्यात सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. कायदा सक्षम आहे. पण त्यावर दबाव आणला जातो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.